Mon, Jun 24, 2019 21:58होमपेज › Konkan › ओखी वादळातील नुकसानीचे पंचनामे सुरू

ओखी वादळातील नुकसानीचे पंचनामे सुरू

Published On: Dec 10 2017 1:20AM | Last Updated: Dec 09 2017 8:35PM

बुकमार्क करा

रत्नागिरीः प्रतिनिधी

ओखी चक्रीवादळामुळे जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील मच्छीमार नौकांचे नुकसान झालेले आहे. मासेमारी जाळी वाहून गेली आहेत. आंबा व काजू पिकांच्या नुकसानीचा अंदाज सध्या घेता येत नाही. याबाबत पीक उत्पादनानंतर सरासरी काढून भरपाई देण्याची तयारी शासनाने केली असून त्यासाठी जिल्ह्यात झालेल्या तीन दिवसांच्या हानीचे पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या. त्यानुसार पंचनामे सुरू करण्यात आले आहे. 

मिरकरवाडा, भगवतीबंदर येथे  आश्रयासाठी आलेल्या परराज्यांतील मच्छीमार बांधवांच्या होड्यांसाठी डिझेल व गॅस पुरवठा करण्यात आला आहे. आश्रयाला आलेल्या केरळ, तमिळनाडू, गुजरात राज्यातील मच्छीमार बांधवांशी संवाद साधून त्यांची तेथील प्रशासनाबरोबर चर्चा घडवून आणण्यात आली आहे. मिरकरवाडा, भगवतीबंदर, नाटे, हर्णै, गुहागर, दापोली आदी ठिकाणी होडी, जाळी आदींचे नुकसान झाले आहे. त्याचे वस्तुनिष्ठ पंचनामे मत्स्य व्यवसाय विभागाला करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

गावखडी, पूर्णगड जिल्ह्यात इतर सखल किनारपट्टी भागात उधाणामुळे स्थानिक विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. त्या विहिरीतील पाणी उपसून पाणी पिण्यास योग्य होण्यासाठी औषध प्रक्रिया करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. उधाणाच्या वेळी सागरी लाटांपासून किनार्‍याचे संरक्षण व्हावे, यासाठी पत्तन विभागाने बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. या दरम्यानच्या कालवधीत परप्रांतीय नौका किती, खलाशी किती त्यांना डिझेलची गरज किती याचा अहवाल तात्काळ तयार करुन त्यांचे मागणीनुसार डिझेल व गॅस पुरवठा करण्यात आली असून त्याची सुरक्षितता अहवाल मागविण्यात आला आहे.