Thu, Apr 25, 2019 14:17होमपेज › Konkan › भाविकांच्या गर्दीत सांब सदाशिवाचा जयजयकार

भाविकांच्या गर्दीत सांब सदाशिवाचा जयजयकार

Published On: Aug 14 2018 1:07AM | Last Updated: Aug 13 2018 11:07PMरत्नागिरी : प्रतिनिधी

पावसाळी आल्हाददायक वातावरणात रविवारपासून श्रावण महिन्याला प्रारंभ झाला. श्रावणाच्या दुसर्‍याच दिवशी सोमवार असल्याने भगवान शंकराच्या सर्वच मंदिरांत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिराबाहेर भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. पहिल्याच श्रावणी सोमवारी जिल्ह्यात असंख्य भाविकांनी सांब सदाशिवाचा जयजयकार केला.

रत्नागिरी शहरातील श्री देव भैरी, मांडवी आणि मुरुगवाड्यातील भैरी मंदिर, किल्‍ला येथील सांब आणि भागेश्‍वर मंदिर, राजीवड्यातील काशी विश्‍वेश्‍वर मंदिर आदी ठिकाणी भाविकांनी गर्दी केली होती. डोर्ले गावातील श्री स्थानेश्‍वर, भडे गावातील सोमेश्‍वर, हर्चे गावांतील सत्येश्‍वर मंदिर, गावखडीतील रामेश्‍वर मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली. जिल्ह्यात सर्वत्र उत्साहाचे आणि भक्‍तीमय वातावरण होते. श्री क्षेत्र मार्लेश्‍वर मंदिरामध्येही अगदी उत्साही वातावरणात गर्दी होती. 

मंदिराबाहेर बेल व पान-फूल विक्रेत्यांनी स्टॉल मांडले होते. पूजेचे ताट 30 ते 50 रुपयांप्रमाणे विक्री सुरू होती. भाविकांनी दुधाचा अभिषेक केला. सर्व मंदिरात ‘ॐ नम: शिवाय’चा जप सुरू होता. काही मंदिरांमध्ये शिवलीलामृत पारायण सुरू होते. गाभार्‍यात बेलफुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

सोमवारच्या उपवासानिमित्त काही मंदिरात फराळाच्या पदार्थांची सोय केली होती. अभिषेक करण्यासाठी सकाळपासूनच मंदिरांमध्ये गर्दी दिसत होती. अनेक मंदिरांमध्ये हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये कीर्तन, प्रवचन, भजन यांचा समावेश आहे. त्यामुळे परिसरातील वातावरण भक्‍तीमय झाले असून, भाविक भक्‍तीरसात चिंब होत आहेत.

तृणबिंदूकेश्‍वरावर संततधार

रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरामध्ये श्री देव तृणबिंदूकेश्‍वरावर रुद्रानुष्ठान संततधार करण्यात येत आहे. सोमवारी पहाटेपासून संततधारेला प्रारंभ झाला. प्रतिवर्षाप्रमाणे या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव भैरी देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.