Thu, Aug 22, 2019 08:10होमपेज › Konkan › ‘मँगो सिटी’ पर्यटन महोत्सवाला प्रारंभ

‘मँगो सिटी’ पर्यटन महोत्सवाला प्रारंभ

Published On: Apr 29 2018 11:53PM | Last Updated: Apr 29 2018 11:14PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

शहराच्या मँगो सिटी पर्यटनाला रविवारी सकाळी 6.30 वा.पासून प्रारंभ झाला. पर्यटकांसोबत नगराध्यक्ष राहुल पंडित व सहकारी नगरसेवक रत्नागिरी नगरपरिषदेच्या आवारातून सजविलेल्या बसमधून शहर व आजूबाजूच्या पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी बाहेर पडले. सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण सांगणार्‍या विशेष कारागृहाला भेट देण्यात आली. येथील स्वा. सावरकरांच्या कोठडीचे दर्शन घेऊन सर्व जण बसने पुढील पर्यटनस्थळे पाहण्यास रवाना झाले.

या महोत्सवाच्या निमित्ताने रनप आवारात माहिती केंद्र उभारले आहे. हे माहिती केंद्र कोकणी खेडेगावातील मातीच्या कौलारू घराप्रमाणे आहे. परसात तुळस वृंदावन असते तसे वृंदावन येथेही आहे. अशा दृष्यांमुळे या आवारात खेडेगावच अवतरल्याचा भास होतो. येथे शहर व आजूबाजूची पर्यटन स्थळे, तेेथे जाणार्‍या मार्गाची माहिती देणारा फलक लावला आहे.

माहिती केंद्राच्या ठिकाणी टाळ-मृदुंगाच्या तालावर भजन सुरू होते. ही भजनी मंडळी पर्यटकांना पर्यटन स्थळांची सफर घडविणार्‍या बसमध्येही होती. त्यांच्या भजनाला पर्यटकांसह नगराध्यक्ष व नगरसेवक, नगरसेविकांचीही साथ मिळत होती. नगरसेवक निमेश नायर टाळ वाजवीत भजनात दंग झाले होते. नगराध्यक्षांसह सभापती वैभवी खेडेकर, श्रद्धा हळदणकर, रशिदा गोदड, सुहेल मुकादम, दया चवंडे, मीरा पिलणकर, शिल्पा सुर्वे, सेना नेते बिपीन बंदरकर, विजय खेडेकर, आप्पा चवंडे यांनीही बस सफरीने पर्यटन स्थळे पाहिली. 

कोकणच्या लोककलेचे आज सादरीकरण

या महोत्सवातील सोमवारचे कार्यक्रमही आकर्षक आहेत. सायं. 4 वा. टिळक आळी येथे फनिस्ट्रीट कार्यक्रम आहे. त्यानंतर 6.30 वा. कोकणातील विविध लोककलांचे सादरीकरण होणार आहे. स्वा. सावरकर नाट्यगृहात या लोककलांचा कार्यक्रम होणार आहे.