होमपेज › Konkan › मासेमारी हंगाम सुरू

मासेमारी हंगाम सुरू

Published On: Aug 02 2018 1:59AM | Last Updated: Aug 01 2018 11:32PMदेवगड : प्रतिनिधी

खोल समुद्रातील मच्छीमारीबंदी कालावधी संपल्यामुळे 1 ऑगस्टपासून समुद्रातील मच्छीमारी सुरू झाली असून, मच्छीमारांनी आपल्या नौका पाण्यात लोटण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. सध्या समुद्रातील वातावरण चांगले असल्यामुळे मच्छीमारीला सुरुवात होणार आहे. 

समुद्रात सहा ते सात वावामध्ये किनारपट्टीलगत बांगडा, मोरी हे मासे मिळत असल्याने व माशांना चांगला दरही मिळण्याची शक्यता असल्याने कांडाळीद्वारे मच्छीमारी करण्यास सुरुवात झाली आहे. सध्या समुद्रात मिळणारे सौंदाळे, दोडी, सफेद कोळंबी ही मासळी खाडीत मिळत असल्याने खाडीतील मच्छीमारीलाही वेग आला आहे. मात्र, मोठ्या नौका अद्याप लोटण्यास प्रारंभ झाला नसला, तरी ट्रॉलर्सद्वारे करण्यात येणारी मच्छीमारी ही नारळी पौर्णिमेनंतरच सुरू होण्याची शक्यता मच्छीमार नेते भाई खोबरेकर यांनी कक्‍त केली आहे.

खोल समुद्रातील मच्छीमारी बंद असलेल्या कालावधीत खाडीतील पारंपरिक मच्छीमारी सुरू असते. मात्र, मध्येच पावसाने दडी मारल्यामुळे पारंपरिक मच्छीमारी व्यवसायावरही परिणाम झाला. त्यामुळे दोन महिन्यांच्या कालावधीनंतर खोल समुद्रातील मच्छीमारी सुरू झाल्यास दर्जेदार मासळी मिळण्याची अपेक्षा खवय्यांमध्ये आहे.

गेले दोन महिने समुद्रामधील मत्स्य व्यवसायावर बंदी असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनाही चांगल्या मासळीची उणीव भासत होती.यामुळे व्यवसायावरही परिणाम दिसून येत होता.बर्‍याचवेळी देवगडमध्ये येणारे पर्यटक हे विशेषकरून येथील दर्जेदार मासळीचा आस्वाद घेण्यासाठी येत होते मात्र आता खोल समुद्रातील मच्छीमारी सुरू होत असल्यामुळे दर्जेदार मासळीची प्रतीक्षा संपणार आहे.