Tue, May 21, 2019 22:09होमपेज › Konkan › तळेरेचा सुपुत्र श्रीयान्स तळेकर बनला ‘पायलट’

तळेरेचा सुपुत्र श्रीयान्स तळेकर बनला ‘पायलट’

Published On: May 12 2018 1:29AM | Last Updated: May 11 2018 8:42PMकणकवली : प्रतिनिधी 

आकाशात ऊंच भरारी घेण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते. परंतु प्रत्येकाचे स्वप्न साकार होते असे नाही. मोजक्या लोकांनाच हे भाग्य लाभते आणि अशाच प्रकारचे भाग्य कणकवली तालुक्यातील तळेरे गावचे सुपुत्र श्रीयान्स  संतोष तळेकर या तरुणाला लाभले आहे. मुंबई येथे राहणार्‍या या तरुणाचे वैमानिक (पायलट) होण्याचे स्वप्न पूर्ण झाले असुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वैमानिक होण्याचा मान श्रीयान्स यांनी मिळवत सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त युवक वैमानिक यासारख्या खडतर आणि तितक्याच धाडसी क्षेत्रात ज्यावेळी येतील त्यावेळीच खर्‍या अर्थाने सिंधुदुर्गचे नाव आणखी उज्ज्वल होईल, असा विश्‍वासही कॅप्टन श्रीयान्स संतोष तळेकर याने व्यक्त केला आहे.

कणकवली तालुक्यातील तळेरे गावच्या श्रीयान्स संतोष तळेकर या सुपुत्राने लहानपणापासुनच वैमानिक बनण्याचे ध्येय  ठेवले आणि त्याने हे ध्येय पुर्णही केले. यामागे श्रीयान्सची असलेली मेहनत आणि त्याला मिळालेली कुटुंबीयांची साथ अत्यंत महत्त्वाची आहे. श्रीयान्सचे वडील संतोष तळेकर हे पेशाने टॅक्स कंन्सल्टंट आहेत तर आई स्नेहांजली तळेकर यासुध्दा व्यवसायिक आहे. तर श्रीयान्सचे भाऊ मृगांक हाही शिक्षण घेत आहे. घरचे वातावरण शैक्षणिकदृष्ट्या पोषक असल्याने श्रीयान्सचे वेगळे काहीतरी करण्याची हिंमत मिळाली आणि यात तो यशस्वी झाला. श्रीयान्स याच्या या यशाचा तळेरे गावाला सार्थ अभिमान आहे.

आपल्या वैमानिक वाटचालीबाबत बोलताना श्रीयान्स म्हणाला, मी ध्येय वेडा आहे. ज्याच्यासाठी तुम्ही संघर्ष करता आणि ज्या गोष्टीचा प्रत्येकक्षणी विचार करता अशांबद्दलच हे क्षेत्र आहे. माझ्यासाठी हे उड्डाणाबाबत होते. मी वैमानिक होण्याच्या आणि ढगांमधून विमान उडविण्याच्या विचाराने प्रभावित झालो होतो आणि यामधूनच एक तीव्र इच्छा प्रज्वलित झाली. मी वैमानिक प्रशिक्षणासंदर्भात संबंधित सर्व अभ्यासक्रमांचा शोध घेतला. त्याचप्रमाणे माझे स्वत:चेही संशोधन केले. कारण या क्षेत्रामध्ये माझ्या कुटुंबातील किंवा जवळपासचे कुणी नव्हते. खूप प्रयत्नानंतर अखेर शेवटी मला जे हवे होते ते मी निवडले आणि माझे ध्येय निश्‍चित केले. 12 उत्तीर्ण झाल्यावर मी व्यवसायिक वैमानिक परवाना सीपीएल हे प्रशिक्षण सुरू केले. त्याचबरोबर मी माझ्या पदवीचा अभ्यासही चालू ठेवला.

जेणेकरुन मी पदवीधरही होऊ शकेन. यातील महत्वाचा भाग म्हणजे सुरुवातीच्या क्लास 2 वैद्यकीय चाचणी पास होणे ही प्रत्येक महत्वाकांक्षी वैमानिकासाठी आवश्यक असते. मी माझ्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण केल्या आणि बॉम्बे प्लाईंग क्लब (सीपीएल) या व्यवसायिक वैमानिक प्रशिक्षणामध्ये एकूण 5 लेखी पेपर व 1 तोंडी पेपर असतो आणि या प्रत्येक पेपरमध्ये उमेदवाराला कमीत कमी 70 टक्के गुण मिळवावेच लागतात. विमानाच्या भोवती असणे हे माझ्या दृष्टीने मजेशीर होते. त्याहीपेक्षा अतिशय उच्च शिक्षीत आणि अनुभवी लोकांकडुन शिकायला मिळत होतं. अस म्हटले जातं कि आकाश ही एक मर्यादा आहे, परंतु विश्‍वास ठेवा आम्हा वैमानिकांसाठी ते एक घरच आहे, असे सांगतानाच श्रीयांत म्हणाला लवकरच मी माझे उड्डाणाचे धडे सुरु केले आणि विमान उडविण्याचा आणि त्यातील रोमांच अनुभवण्याचा तो एक सुरेख अनुभव होता. त्यानंतर मी एकट्याने उड्डाण करायला सुरुवात केली. कि जी सीपीएल या प्रशिक्षणाची गरज असते. हे प्रशिक्षण अतिशय खडतर आणि आव्हानात्मक होत.

परंतु मी ज्याच्यासाठी ही सुरुवात केलेली होती ते सर्व अडथळे पार करुन आता फक्त एका पावलावरच होतो. मी माझे संपुर्ण प्रशिक्षण तीन वर्षामध्ये पुर्ण केले आणि माझी सीपीएल आणि बीएससी एव्हीएशन डिग्री मुंबई विद्यापीठातून प्राप्त केली. माझ्यासाठी आणि माझ्या आई वडीलांसाठी हा एक अभिमानास्पद क्षण होता. माझे आई-वडील माझ्या या आगळ्या वेगळ्या पेशाचे अविभाज्य भाग बनले होते आणि माझ्या प्रत्येक चढ उतारामध्ये त्यांनी मला आधार दिला. सीपीएल पुर्ण झाल्यानंतर मी मार्गदर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली आणि इतर महत्त्वाकांक्षी वैमानिकांना प्रशिक्षण दिले आणि आता माझी स्वत:ची ‘मावेरीक एव्हीशन’ नावाची संस्था आहे. जेथे आम्ही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतो. त्याचप्रमाणे इतर हवाई सेवांप्रमाणे सेवाही देतो. प्रत्येक मुला-मुलींचे काही संपादन करण्यासाठीचे जे स्वप्न असते त्यांना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते ‘स्वप्ने पाहू नका ध्येय बाळगा’ कारण ज्यावेळी आपण आपल ध्येय निश्‍चित करतो त्यावेळी आपण त्या ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करत राहतो. आणि ध्येयच जी गोष्ट आपण संपादन करु शकणार नाही असा विचार करत असतो ती संपादन करण्यासाठी एक पाऊल पुढेच घेऊन जातात. त्यामुळे ध्येयाच्या पाठिशी रहा, असा सल्ला कॅप्टन श्रीयान्स संतोष तळेकर यानी दिला आहे.

श्रीयान्सच्या या यशाचा तळेरे गावाला मोठा अभिमान आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांच्या हस्ते श्रीयान्सचा ‘तळेरे रत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे सिंधुदुर्गातुनही वैमानिक क्षेत्रात तरुण यावेत, असा श्रीयान्सचा आग्रह असून यासाठी लागणारे सहकार्य आणि मदत करण्यास आपण तयार आहोत, असेही श्रीयान्स याने सांगितले.