Mon, Aug 19, 2019 07:27होमपेज › Konkan › मोंडच्या सुपुत्राची गगनभरारी!

मोंडच्या सुपुत्राची गगनभरारी!

Published On: Sep 02 2018 1:13AM | Last Updated: Sep 01 2018 11:08PMदेवगड : सूरज कोयंडे

मोंड गावचा सुपुत्र स्क्‍वॅशपटू महेश दयानंद माणगावकर यांनी सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत भारतासाठी सांघिक कांस्यपदक पटकाविले. मोंड गावच्या सुपुत्राने आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या या चमकदार कामगिरीमुळे देशाबरोबरच देवगड तालुक्याचेही नाव उंचावले आहे. अवघ्या 23 व्या वर्षीच त्याने केलेल्या या देदीप्यमान कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आठव्या वर्षांपासूनच स्क्‍वॅश या खेळाची आवड असलेल्या महेशने खेळासाठी प्रचंड मेहनत घेऊन विविध स्पर्धा जिंकल्या. बोरिवली येथील क्लब अ‍ॅक्वेरियामध्ये सहभागी होऊन त्याने या खेळाचा श्रीगणेशा केला व नंतर मागे वळून पाहिले नाही. विविध क्लबने त्याला सभासदत्व दिले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसारखे दिग्गज खेळाडू नावारूपास आले त्या क्रिकेट क्लब ऑफ इंडिया. या क्लबचाही सभासद होऊन त्यांनी स्क्‍वॅश खेळाचे प्रशिक्षण घेऊन उत्तुंग भरारी घेण्यास सुरुवात केली. भारतामध्ये या खेळास चांगल्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे युरोप, नेदरलँडमध्ये या खेळाचे प्रशिक्षण घेत आहे. 14 व्या वर्षीच त्यांनी ब्रिटिश ओपनमध्ये सुवर्णपदक मिळवून खेळामध्ये चढती कमान ठेवली. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन त्यांनी सुवर्ण, रौप्य, कांस्य अशा एकूण 160 पदकांची कमाई केली.सध्या सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत स्क्‍वॅश या खेळात तो चार सदस्यीय 

भारतीय संघामध्ये सहभागी असून या स्पर्धेत भारतीय संघाने कांस्यपदक पटकावून भारतीयांचे नाव उंचावले. भारतीय खेळाडूंचा पदकांचा आलेख उंचावत असून त्यात स्क्वॉश खेळात मिळालेल्या कांस्यपदकाचा समावेश आहे. अवघ्या 23 व्या वर्षी सध्या एस्वाय्बीए वर्गात शिकत असलेल्या महेशने खेळाबरोबरच अभ्यासावरही लक्ष केंद्रीत केले. मात्र, वरचेवर स्पर्धांमध्ये सहभाग घेत असल्यामुळे परीक्षांचे व खेळाचे वेळापत्रक जुळत नसल्याने शिक्षणातही त्याला मध्ये मध्ये ब्रेक घ्यावा लागला. तरीही त्याचे शिक्षण सुरू आहे.खेळाबरोबच शिक्षणालाही त्यांनी तेवढेच महत्त्व दिले आहे. त्याच्या या उत्तुंग यशाच्या गगनभरारीमध्ये आईचा वाटा मोठा असल्याचे त्याचे वडील दयानंद माणगांवकर यांनी दै.पुढारीशी बोलताना सांगितले. आपल्या मुलाची खेळाविषयक असलेली आवड व अल्पावधीतच खेळात त्यांनी केलेली प्रगती पाहून नोकरीला असलेल्या आईने नोकरीवरही पाणी सोडून मुलासाठी सर्वस्व वेचले.त्याच्याबरोबर राहून तिने त्याला प्रोत्साहन दिले. तिने मुलासाठी घेतलेली प्रचंड मेहनत व त्यांनी खेळासाठी घेतलेले प्रचंड परिश्रम यामुळेच वयाच्या 23 व्या वर्षी त्यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करून देशाला आशियाई स्पर्धेत आणखी एका पदकाची कमाई करून दिली.

महेशने देशासाठी केलेल्या या सांघिक यशाबद्दल व देशाला मिळवून दिलेल्या कांस्य पदकाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत असून विशेषत: सुपुत्र असलेल्या देवगड तालुक्यासाठी व त्याचा मोंड गावासाठी हे अभिमानास्पद यश ठरले आहे.