Thu, Apr 25, 2019 15:25होमपेज › Konkan › दीडशेगणेशोत्सव विशेष गाड्यांना सिंधुदुर्गात थांबे 

दीडशेगणेशोत्सव विशेष गाड्यांना सिंधुदुर्गात थांबे 

Published On: Aug 14 2018 1:07AM | Last Updated: Aug 13 2018 10:30PMकणकवली : प्रतिनिधी

कोकणात गणेश चतुर्थीसाठी येणार्‍या चाकरमान्यांच्या सोईसाठी कोकण रेल्वेने मध्यम आणि पश्‍चिम रेल्वेच्या समन्वयातून कोकणात जाणार्‍या प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेऊन 182 विशेष गाड्या सोडल्या आहेत. यातील 32 गाड्या या रत्नागिरी स्टेशनपर्यंत धावणार आहेत. इतर गाड्या या सिंधुदुर्गातील प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन धावणार आहेत. यातील 150 विशेष गाड्यांना राजापूर, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी मनसे नेते माजी आ. परशुराम उपरकर यांना पाठविलेल्या पत्रात दिली आहे.

परशुराम उपरकर यांनी कोकणात गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने येणार्‍या चाकरमान्यांची संख्या लक्षात घेऊन कोकणात येणार्‍या गाड्यांना दिवा स्टेशनवर तसेच जिल्ह्यातील प्रमुख स्टेशनवर थांबा देण्यात यावा. त्याचप्रमाणे बांद्रा व विरार वेस्टर्न लाईनवरून गाड्या सोडण्याची मागणी केली होती. त्यासाठी प्रत्यक्ष कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चा केली होती. दादरवरून सुटणारी तुतारी एक्स्प्रेस ही सावंतवाडीपर्यंत असल्याने या गाडीला वेटिंग लिस्ट मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या गाडीला आणखी तीन डबे लावल्यास चाकरमान्यांची सोय होऊन कोकण रेल्वेचे उत्पन्‍न वाढेल, याबाबत लक्ष वेधले होते. त्यावर कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी यांनी परशुराम उपरकर यांना लेखी पत्राद्वारे उत्तर दिले आहे. 

दिवा स्टेशन हे मध्य रेल्वेच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याने या विशेष जादा गाड्यांना दिवा स्टेशनवर थांबा देण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या अधिकारात येतो. त्यामुळे आपले म्हणणे त्यांच्यापर्यंत पोहोचविले जाईल, अशी ग्वाही देण्यात आली आहे. 11 आणि 12  सप्टेंबरला मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात येणार आहेत. या काळात विशेष जादा गाड्या सोडण्याची त्यांनी मागणी केली होती. त्यावर 11 सप्टेंबरला 8 आणि 12 सप्टेंबरला 5 अतिरिक्‍त गणपती स्पेशल विशेष गाड्या धावणार आहेत. 12 सप्टेंबरला आणखी जादा गाड्या चालविण्याचे आमचे प्रयत्न आहेत. गौरी विसर्जनानंतर परतणार्‍या प्रवाशांसाठी 17 सप्टेंबरला 4 आणि 18 सप्टेंबरला 3 स्पेशल गाड्या धावणार आहेत. 

त्रिवेंद्रम-एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेस कणकवली स्टेशनवर कोकणकन्या एक्स्प्रेसच्या वेळी क्रॉसिंगसाठी थांबते, या गाडीला कणकवली स्टेशनवर थांबा देण्याची मागणी उपरकर यांनी केली होती. त्यावर वेळेनुसार नेत्रावती एक्स्प्रेस आणि कोकणकन्या एक्स्प्रेसच्या दरम्यान क्रॉसिंगची व्यवस्था कणकवली स्टेशनवर नाही. जर गाड्या वेळेत धावत नसतील, तर अशा वेळी दोन गाड्यांचे क्रॉमिंग कणकवली स्टेशनवर होते. पश्‍चिम रेल्वेच्या बांद्रा आणि विरार स्टेशनवरून गाड्या सोडण्याचा अधिकार हा पश्‍चिम रेल्वेच्या अधिकार क्षेत्रात येतो. त्यामुळे याबाबत आपले म्हणणे कळविले जाईल.