होमपेज › Konkan › विशिष्ट वर्गातील कैद्यांना मिळणार विशेष माफी

विशिष्ट वर्गातील कैद्यांना मिळणार विशेष माफी

Published On: Aug 17 2018 10:37PM | Last Updated: Aug 17 2018 8:35PMकणकवली : प्रतिनिधी

केंद्र शासनाने महात्मा गांधींची 150 वी जयंती 2 ऑक्टोबर 2018 ते 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या मानवतावादी दृष्टीकोनातून बंद्यांची कारागृहातील वागणूक विचारात घेता विशिष्ट वर्गात येणार्‍या बंद्यांना विशेष माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. 

त्या अनुषंगाने केंद्र शासनाने दिलेल्य मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने बंद्यांचा प्रस्ताव राज्यस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करण्यास गृह विभागाने मान्यता दिली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी गृह विभागाचे अतिरिक्‍त मुख्य सचिव, सदस्यपदी विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, कारागृह पोलिस महासंचालक, कारागृह अप्पर पोलिस महासंचालक यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना तसेच विहित केलेल्या वेळापत्रकानुसार 2 ऑक्टोबर 2018, 6 एप्रिल 2019 व 2 ऑक्टोबर 2019 अशा तीन टप्प्यात बंद्यांना कारागृहातून मुक्‍त करण्यात येणार आहे. अर्थात त्यासाठीचे काही निकष ठरविण्यात आले असून राज्यस्तरीय समिती अटी व निकषांच्या आधारे प्रस्तावांची छाननी करून निर्णय घेणार आहे आणि आपला अहवाल राज्य शासनास सादर करणार आहेत.