Mon, Jan 27, 2020 11:11होमपेज › Konkan › विशेष चौकशी पथक स्थापन

विशेष चौकशी पथक स्थापन

Published On: Jul 07 2019 1:30AM | Last Updated: Jul 06 2019 10:03PM
मुंबई/रत्नागिरी : प्रतिनिधी

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून दि. 2 जुलै रोजी जीवितहानी झाली. याप्रकरणी धरणस्थळी भेट दिलेल्या जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी विशेष चौकशी पथक नेमण्यात येऊन याची चौकशी करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने शनिवारी चार सदस्यीय विशेष चौकशी पथकाची स्थापना केली आहे. या समितीला अहवाल देण्यास दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

धरण फुटल्याने झालेल्या जीवित व वित्तहानीप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी या पथकाची स्थापना करण्यात आली आहे. जलसंपदा तथा कार्यकारी संचालक विदर्भ सिंचन विकास महामंडळ नागपूरचे सचिव अविनाश सुर्वे यांची पथक प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर मुख्य अभियंता (लघू सिंचन) संधारण, रत्नागिरी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. या पथकामार्फत तिवरे धरण फुटीच्या कारणांचा शोध घेऊन दोषींवर जबाबदारी निश्‍चित करणे व त्यानुसार अनुषंगिक चौकशी करणे तसेच लघू सिंचन तलाव, पाझर तलाव, गाव तलाव, माल गुजारी तलाव व इतर तत्सम तलावांबाबतही भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाय सूचवणे ही जबाबदारी आहे. या पथकाने आपला अहवाल दोन महिन्याच्या आत शासनाला सादर करायचा आहे.

2 जुलै रोजी तिवरे धरण फुटून 23 जणांचा बळी गेला. तसेच मोठ्या प्रमाणात स्थानिकांच्या घरांचे आणि मालमत्तांचे नुकसान झाले. जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी तर हे धरण खेकड्यांनी पोखरल्यामुळे फुटल्याचा अजब दावा केल्यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. स्थानिक आमदाराचा भाऊ धरणाचा कंत्राटदार असल्याने त्याला वाचविण्यासाठी सावंत यांनी जाणीवपूर्वक हे वक्‍तव्य केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. त्यांच्या या वक्‍तव्याच्या विरोधात राज्यात विविध ठिकाणी निदर्शनेही करण्यात आली. त्यातच 8 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे या धरणाची पाहणी करणार आहेत. धरणफुटीचे प्रकरण गंभीर बनत चालल्याने राज्य सरकार या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला.