Fri, Jan 24, 2020 23:02होमपेज › Konkan › अपघात टाळण्यासाठी वीज वाहिन्यांना बसवणार ‘स्पेसर’

अपघात टाळण्यासाठी वीज वाहिन्यांना बसवणार ‘स्पेसर’

Published On: Jun 04 2019 1:31AM | Last Updated: Jun 03 2019 11:05PM
कणकवली : प्रतिनिधी

पावसाळ्यातील आपत्कालीन संभाव्य घटनांना सामोरे जाण्यासाठी महावितरणकडून आवश्यक ती पूर्वतयारी करण्यात आली आहे. वादळी पावसात अनेकवेळा वीजवाहिन्या तुटून खाली पडतात आणि त्याला स्पर्श होऊन जनावरे आणि मनुष्यहानी झाल्याच्या घटना वाढल्या आहेत. पावसाळ्यातील अशा घटना टाळण्यासाठी महावितरणने वीज वाहिन्यांना ‘स्पेसर’ बसविण्याची कार्यवाही सुरू केली आहे. या स्पेसरमुळे वीज वाहिन्या एकमेकांना घासणार नाहीत आणि तुटल्याच तर खाली पडणार नाहीत. शिवाय वीजवाहिनी तुटल्यास तत्काळ पोलवरून फ्यूज डिस्कनेक्ट होणार आहे. त्यामुळे मनुष्य किंवा जनावरांची जीवितहानी टाळता येणार आहे. 

महावितरणच्या कणकवली उपविभागाचे कार्यकारी अभियंता संजय गवळी यांनी ही माहिती दिली. पावसाळ्यात किंवा पावसाळ्यानंतर ज्यावेळी अवकाळी वादळी पाऊस होतो, त्यावेळी झाडांच्या फांद्या पडून किंवा वादळी वार्‍यानेही वीज वाहिन्या तुटून खाली पडतात. अशा वीज वाहिन्यांमध्ये सप्लाय सुरू राहत असल्याने त्याला स्पर्श होऊन गुरे किंवा माणसे मृत्युमुखी पडल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. सहा महिन्यांपूर्वी महावितरणचे संचालक श्री. पाठक हे सिंधुदुर्ग दौर्‍यावर आले होते. त्यांनी महावितरणच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी पावसाळ्यात वीजवाहिन्या तुटून होणार्‍या दुर्घटनांकडे पत्रकारांनी त्यांचे लक्ष वेधले होते. पाठक यांनी या बाबीची दखल  घेऊन कोकण विभागाच्या मुख्य अभियंत्यांना पावसाळ्यापूर्वी याबाबत ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानुसार महावितरणने सिंधुदुर्गात वीज वाहिन्यांना स्पेसर बसविण्याचे काम हाती घेतले आहे. यामध्ये प्राधान्याने रस्ते, वाटा याठिकाणी हे स्पेसर बसविले जाणार आहेत. 

पावसाळ्यात झाडांच्या फांद्यांनी वीज वाहिन्या तुटू नयेत यासाठी फांद्या तोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कणकवली उपविभागासाठी 200 नवीन पोलची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय इमर्जन्सीसाठी वीज ट्रान्सफॉर्मर सज्ज ठेवण्यात आली आहेत. वीजपुरवठा खंडित होऊन लोकांची गैरसोय होऊ नये महावितरणने आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. जिल्ह्यात कृषी वीज पंपाची 650 प्रकरणे प्रलंबित आहेत. ठेकेदाराकडून या जोडण्यांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने ही कामे होऊ शकली नाहीत. मात्र, आता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतून कृषी पंपांची ही कामे मार्गी लावणार असल्याचे संजय गवळी यांनी सांगितले. 

रिक्‍त पदांमुळे कामांवर परिणाम

महावितरणमध्ये सध्या अधिकारी आणि वायरमन यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्‍त आहेत. कणकवली उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता पद गेल्या 8 महिन्यांपासून रिक्‍त आहे. याशिवाय कणकवली ग्रामीणचे सहायक अभियंता हे पदही रिक्‍त आहे. उपविभागात वायरमनची सुमारे 60 पदे रिक्‍त आहेत. परिणामी कंत्राटी कर्मचार्‍यांवरच भार आहे. विशेष म्हणजे कंत्राटी कर्मचारी हे सकाळी 8 ते 5 वा.  या वेळेत काम करतात. मात्र, त्यानंतर ग्राहकांच्या तक्रारी आल्यास कामांची तत्काळ कार्यवाही करणे शक्य होत नाही. कोकण विभागातच मोठ्या प्रमाणात वायरमनची पदे रिक्‍त आहेत. याठिकाणी जिल्ह्याबाहेरील उमेदवार येऊन भरती होतात आणि तीन वर्षे झाली पुन्हा आपल्या भागात बदली करून घेतात. त्यामुळे कोकण विभागात कोकणातीलच आयटीआय उमेदवारांची भरती होणे आवश्यक आहे.