Sun, Jul 21, 2019 10:11होमपेज › Konkan › विमानतळासाठी जागेची आवश्यकता : वायकर

विमानतळासाठी जागेची आवश्यकता : वायकर

Published On: Aug 16 2018 10:51PM | Last Updated: Aug 16 2018 10:05PMरत्नागिरी : प्रतिनिधी

येथील प्रस्तापित विमानतळावरुन तटरक्षक दल, नौदल व नियमित प्रवासी वाहतूक  सुरु करण्यासाठी 69 एकर अतिरिक्‍त जागेची आवश्यकता आहे. ही जागा ताब्यात घेण्यासाठी रेडीरेकनरच्या चौपट दर देण्याचे मान्य करण्यात आले असल्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी सांगितले.

जिल्हा नियोजनच्या बैठकीनंतर ते बोलत होते. राज्य शासनामार्फत ही जागा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा नियोजनच्या बैठकीत 183.13 कोटींच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. मागील विकासकामांचे 170.99 कोटींचे दायित्व असून ते 100 टक्के दिले जाईल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक तालुक्यात अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर उभारण्यार येणार आहे. संगमेश्‍वर तालुक्यातील कसबा येथे संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा डिसेंबरपर्यंत उभारला जाणार असल्याचे ना. वायकर यावेळी म्हणाले. जिल्ह्यातील 313 धनगरवाड्या मूलभूत सुविधा मिळण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत एकाच ठिकाणी घरकुल उभारण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात 404 साकव प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून चिपळूण बांधकाम विभागात 197 तर रत्नागिरी विभागात 207 साकवांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा रूग्णालयात डायलेसिस युनिट, डिजिटल शाळांना नेट कनेक्टिव्हिटी याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. मुंबई मरिन लाईनच्या धर्तीवर मिर्‍या येथे 279 कोटी खर्चाचा संरक्षक बंधारा उभारण्याच्या द‍ृष्टीने आपले प्रयत्न असल्याचे ना. वायकर यांनी यावेळी सांगितले.

नगरपालिकेच्या आवारातील व्हिक्टोरिया क्‍लबमधील गंभीर प्रकाराची चौकशी करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांना देण्यात आल्या आहेत. पालिकेमार्फत योग्य ती कारवाई सुरू असल्याचे ना. वायकर यांनी सांगितले.