Mon, Jun 24, 2019 21:04होमपेज › Konkan › मान्सून ‘सुपरफास्ट’

मान्सून ‘सुपरफास्ट’

Published On: May 31 2018 1:39AM | Last Updated: May 31 2018 12:48AMसिंधुदुर्ग : गणेश जेठे

मान्सूनने बुधवारी पूर्ण केरळ व्यापून दक्षिण कर्नाटकात प्रवेश केला आहे. पुढच्या दोन दिवसांत मान्सूनचा प्रवास असाच सुरू राहणार असून कर्नाटक व्यापून हा मान्सून गोव्याच्या हद्दीवर प्रवेश करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र या भागांत 5 जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल आणि त्यानंतर 12 जूनपर्यंत तुफानी पाऊस कोसळत राहील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याचे निवृत्त शास्त्रज्ञ दिनेश मिश्रा यांनी व्यक्त केला आहे. 

अंदमान, श्रीलंका व्यापत अवघ्या दोन दिवसांत मान्सून केरळ राज्यात धडकला होता. बुधवारी दिवसभरात केरळ राज्याचा पूर्ण भाग व्यापून तामिळनाडू राज्याच्या काही भागांत मान्सून सक्रिय झाला आहे. त्यानंतर दक्षिण कर्नाटकातील मेंगलोर भागात तुफानी पर्जन्यवृष्टी झाली. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तसाच कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रातही तयार झाला आहे. या दोन्ही पट्ट्यांना जोडणारी विंड लाईन तयार झाली असून ती वेगाने उत्तरेकडे सरकत आहे. परिणामी, मान्सूनचा हा सुपरफास्ट प्रवास तुफानी पाऊस देत पुढे सुरू आहे. दिनेश मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार 5 जूनपासून महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होईल. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै बंदरापर्यंत मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा 6 ते 7 जून रोजी होऊ शकते, असाही अंदाज मिश्रा यांनी व्यक्त केला. या वर्षीचा पाऊस चांगला होणार असून मान्सूनच्या दणकेबाज आगमनाचे स्वागत शेतकर्‍यांकडून होत आहे. सिंधुदुर्गात अजूनही नद्या, नाले, विहिरी कोरड्या असल्याने पाणी टंचाई सुरू आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त भागातील लोक मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरू असून वादळवार्‍यासहीत पर्जन्यवृष्टी काही ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व पावसाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. पुढील 48 तासात इशान्य भारतात नागालँड, मिझोरामा, त्रिपुरा, मणिपुर या भागात पर्जन्यवृष्टी होणार आहे असाही अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 

कावळ्याची घरटी सांगतात सामान्य पाऊस
जेव्हा पाऊस जास्त येण्याची शक्यता असते, वादळ वारे वार्‍यासहीत पाऊस येऊन पूरपरिस्थिती निर्माण होते तेव्हा अगोदर कावळ्यांना ते कळते. त्यामुळे कावळे आपली घरटी झाडांवर जास्त उंचावर न बांधता मध्यावर बांधतात. जेव्हा पाऊस सामान्य असण्याची शक्यता वाटते, तेव्हा त्यांची घरटी उंचावर बांधली जातात. जून महिन्यात कावळे पिल्लांसाठी घरटे बांधण्याचे काम सुरू करतात. तेव्हा ती किती उंचावर बांधली जातात यावरून पाऊस कसा राहील याचा ठोकताळा बांधला जातो. जंगल व प्राणी अभ्यासक मारूती चितमपल्ली यांनी आपल्या संशोधनात्मक लेखांमध्ये याचा उल्लेख केला आहे. यावर्षी घरटी उंचावर असल्यामुळे यावर्षीचा पाऊस सामान्य असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.