होमपेज › Konkan › दक्षिण रत्नागिरी बंद

दक्षिण रत्नागिरी बंद

Published On: Aug 03 2018 10:40PM | Last Updated: Aug 03 2018 10:24PMरत्नागिरी : प्रतिनिधी

‘एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतो देणार नाही... आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’ यासारख्या घोषणांनी सकल मराठा समाजाने रत्नागिरी दणाणून सोडली. एस.टी. बंद, व्यापारी व रिक्षा व्यावसायिकांनी बंदला पाठिंबा दिल्यामुळे संपूर्ण बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता. रत्नागिरी शहरातील बंद यशस्वी झाल्यानंतर माजी खा. नीलेश राणेंच्या नेतृत्वाखाली हातखंबा येथे रास्ता रोको शांततेत पार पडला. लांजा, राजापूरमध्येही उत्स्फूर्त बंद करण्यात आला. लांजा व राजापूर शहरांत निदर्शने करण्यात आली.  रत्नागिरीतील व्यापार्‍यांनी जाहीर केल्याप्रमाणे सकाळपासूनच दुकाने बंद ठेवण्यात आली होती. सकाळी 9 वाजल्यापासून सकल मराठा समाज मारुती मंदिर परिसरात गोळा होण्यास सुरुवात झाली होती. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मारुती मंदिर येथे आंदोलनाला सुरुवात झाली. त्यानंतर मोटारसायकलस्वार तरूणांनी शहरात रॅली काढून बंद बाजारपेठेचा आढावा घेतला. सकल मराठा समाजाचे नेते केशव इंदूलकर, सुधाकर सावंत, प्रताप सावंत-देसाई यांच्या नेतृत्वाखाली शहरात येणार्‍या कोकणनगर, साळवी स्टॉप, नाचणे येथील रस्त्यांची मराठा तरूणांनी नाकाबंदी केली. माजी खा.निलेश राणे हेही मारूती मंदिर येथे आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडताच सर्वांनीच बसून रस्ता बंद केला. यावेळी सुमारे पावणे दोन ते दोन हजार मराठा बंधू-भगिनी मारूती मंदिर सर्कलभोवती एकत्र आले होते. यावेळी प्रमुख पदाधिकार्‍यांनी युवा पिढीला मार्गदर्शन केले. मराठा समाजातील ज्येष्ठ महिला मार्गदर्शक काकी नलावडे यांनी संयमाने तोडफोड न करता आंदोलन पुढे नेण्याच्या सूचना केल्या. प्राची शिंदे यांच्यासह युवा कार्यकर्त्यांनी आरक्षण व शासन दरबारी आलेले अनुभव, झालेले अन्याय उपस्थितांसमोर ठेवले.

शिवसेना माजी जिल्हाप्रमुख राजू महाडिक यांनी मार्गदर्शन करताना शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर आरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करू. मराठा तरूणांच्या पाठीशी कायम राहू, असे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख संजय मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके, नगरसेवक प्रशांत साळुंखे, माजी नगरसेवक संजू साळवी यावेळी उपस्थित होते.

माजी खा.निलेश राणे मार्गदर्शन करताना म्हणाले की, आंदोलनाला उपस्थित मराठा समाज पाहून समाधान वाटले. मराठा समाजाने आता पुढच्या तयारीसाठी सज्ज रहावे. सरकार कुणाचेही असो, आता आपण गप्प बसायचे नाही. मराठा पेटला आहे. आता नुसत्या आश्‍वासनानंतरही विझणार नाही. हा समाजातील जिवंतपणा कायम ठेवा. आरक्षण आपल्याला मिळणारच आहे. बोपर्डीतील आपल्या बहिणीवर अत्त्याचार करणार्‍या चौघांना फाशी द्या, ही मागणीही पूर्ण करू. हे पक्षीय आंदोलन नाही. मराठ्यांचे आंदोलन आहे. सरकारने काय आश्‍वासन द्यायचे ते द्यावे. आयोगही तुमच्याकडे ठेवा, मात्र आरक्षण आम्ही घेणारच. राज्यात अन्य भागात जाळपोळ झाली ती कोण स्वत:साठी करीत नाही. इतक्या वर्षांपासून अन्याय झालेला तरुणवर्ग पहात आहे. त्यातूनच हा उद्रेक होत आहे. 
रत्नागिरीत शांततेत आंदोलन झाले आहे. मात्र, आमची सहनशीलता पाहू नका. छत्रपती शिवरायांनी चारशे वर्षांपूर्वी स्वराज्य स्थापन केले म्हणून आपली ओळख  आहे. यापुढे अन्याय सहन करायचा नाही. शासनाने मराठा समाजाचा अंत पाहू नये. नाहीतर आम्हाला थोपवायला पोलिस फोर्सही पुरणार नाही, असा इशाराही  माजी खा.राणे यांनी दिला. या आंदोलनाला मुस्लिम समाज व कुणबी समाजानेही आंदोलनस्थळी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला. आ.उदय सामंत यांनीही आंदोलनस्थळी येऊन मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. पालीतून रत्नागिरीत येण्यासाठी आपल्याला पाऊणतास लागतो, मात्र, मराठा आंदोलनामुळे अवघ्या 12 मिनिटात आल्याचे सांगितले.

माजी खा. निलेश राणे यांचे मार्गदर्शन झाल्यानंतर सहभागी आंदोलकांनी शहरामधून मोर्चे काढले. या रॅलीचे नेतृत्व महिला भगिनींनी केले. मारूती मंदिरपासून सुरू झालेली रॅली माळनाका, जेलनाका, जिल्हाधिकारी कार्यालय, एसटी स्टॅण्ड, आठवडाबाजार, मारूती आळी, गोखलेनाका, राधाकृष्ण नाका, धनजीनाका, भाजी मंडई मार्गे सिव्हील हॉस्पिटल येथे रॅली आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सांगता करण्यात आली.