होमपेज › Konkan › आपत्कालीन परिस्थितीत किनारपट्टीवर राहणार सदैव सज्ज

देवबाग येथील तरुणांकडून अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 21 2017 8:44PM

बुकमार्क करा

मालवण : वार्ताहर

मालवण किनारपट्टीवर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास रुग्णवाहिका उपलब्ध होण्यास विलंब होत असल्याने  अपघातानंतर  वेळेवर उपचार होत नाहीत. परिणामी अनेकांना आपले प्राण गमवावे लागत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर देवबागमधील 25  हॉटेल व्यावसायिकांनी एकत्र येऊन सहकारी तत्त्वावर आपल्या मिळकतीतील एक वाटा सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. यात अवघ्या दोन महिन्यात तब्बल तीन लाख रुपयांचा निधी उभा करुन अत्याधुनिक सुविधा असलेली रुग्णवाहिका खरेदी करण्यात आली आहे. ही रुग्णवाहिका देवबाग, तारकर्ली आणि वायरी-भूतनाथ या किनारपट्टीवरील आपत्कालीन परिस्थितीसाठी सदैव मोफत सज्ज असणार आहे.

गेल्या काही वर्षात किनारपट्टीवर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासकीय यंत्रणांकडून सुविधा उपलब्ध करताना अनेक अडचणी निर्माण होत असतात. समुद्रात बुडून जखमी झाल्यास त्यांना उपचारासाठी हलविण्यास रुग्णवाहिकाही तत्काळ उपलब्ध होत नाही. रुग्णांना श्‍वसन यंत्रणेची आवश्यकता असल्यास त्याला देवबाग येथून शहरात नेण्यासाठी अर्धा तास लागतो. अनेकदा वाहतूक कोंडीमुळे मोठी रुग्णवाहिका मार्गातच अडकून पडण्याचीही स्थिती निर्माण होते. त्यामुळे अत्याधुनिक रुग्णवाहिकेची आवश्यकता देवबागमध्ये निर्माण झाली होती. ही गरज तरुण व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन पूर्ण केली आहे.

ही रुग्णवाहिका आपत्कालीन परिस्थितीत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.गरिबांसाठी व अत्यावश्यक परिस्थिती निर्माण झाल्यास संस्थेच्या खर्चातून रुग्णवाहिका सेवा पुरविली जाणार आहे. यासाठी दोन चालक, एक सहकारी तसेच ऑक्सिजनचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  रुग्णवाहिकेसाठी सहदेव साळगावकर यांच्याशी संपर्क साधावा.