Fri, Jul 19, 2019 19:54होमपेज › Konkan › कोकणच्या कृषी प्रगतीसाठी ‘स्मार्ट’चा प्रयोग

कोकणच्या कृषी प्रगतीसाठी ‘स्मार्ट’चा प्रयोग

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 26 2018 8:23PMरत्नागिरी : प्रतिनिधी

आत्मा (कृषी तंत्रज्ञान व्यस्थापन संस्था) गेल्यानंतर कोकणच्या कृषी प्रगतीसाठी आता ‘स्मार्ट’चा (स्टेट ऑफ महाराष्ट्र अ‍ॅॅग्री बिझनेस अ‍ॅण्ड रूरल ट्रान्सफॉॅर्मेशन ः राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प) प्रयोग करण्यात येणार आहे. दहा वर्षांपूर्वी कृषी प्रगतीसाठी नवे तंत्र विकसित करताना ‘आत्मा’चा प्रयोग करण्यात आला होता. तो अनेक ठिकाणी पांढरा हत्ती ठरल्यानंतर आता कृषीचे डिजिटायझेशन करताना ‘स्मार्ट’ प्रकल्प कोकणात राबवण्यात येणार आहे.

‘स्मार्ट’ प्रकल्पात कृषी मालाच्या  पणन विषयक सुविधा निर्माण करणे,  संगणकीकृत  शेतमालाचा लिलाव व विक्री व्यवस्था उभारणे, बाजार समित्यांचे संघटन करून त्यांना खासगी बाजारपेठेशी जोडणे, तसेच शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांची प्रगती साधणे हा उद्देश ठेवण्यात आला आहे. 

दहा वर्षांपूर्वी ‘आत्मा’च्या माध्यमातूनही नवे तंत्र कृषी क्षेत्रात आणण्याच्या प्रयत्न करण्यात आला होता. ‘आत्मा’साठी स्वतंत्र व्यवस्थापन यंत्रणा राबवण्यात आली होती. कोकणातही हा प्रयोग करण्यात आला. मात्र, अनेक भागात ‘आत्मा’ जवळपास बंद झाली. ‘आत्मा’च्या माध्यमातून कोकणात आंब्याला हमी भाव मिळावा आणि त्याचे ब्रँडिंग करण्याचा कार्यक्रम राबवण्यात आला होता. त्यानुसार ‘ओम’ ही सेंद्रीय आंबा उत्पादनाची हमी देणारी संस्थाही स्थापन करण्यात आली. मात्र, हे प्रयोग बारगळले. त्यानंतर ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालकांनाही  हलविण्यात आले. त्यामुळे यावर करण्यात आलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यातच गेला होता.

आता त्याचा पुढचा टप्पा  ‘स्मार्ट’द्वारे कोकणात राबवण्यात येणार आहे. यासाठीही स्वतंत्र व्यवस्थापन यंत्रणा स्थापन करण्यात येणार असून ‘स्मार्ट’च्या अंमलबजावणीसाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य घेण्यात येणार आहे. सुमारे दोन हजार कोटींचा हा प्रयोग आता कोकणात राबवताना प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र संचालकही नेमण्यात येणार आहे. ‘स्मार्ट’च्या माध्यमातून लहान शेतकर्‍यांसह मोठ्या शेतकर्‍यांना थेट बाजार व्यवस्थेशी जोडणे, बाजार समित्यांच्या संगणकीय व्यवस्थापन तयार करून  इलेक्ट्रॉनिक विक्री व्यवस्था निर्माण करणे आदी उपक्रम राबवण्यात येणार आहे. तसेच शेतकर्‍यांना नव्या तंत्राची उपयुक्‍तता पटवून त्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहित करणे आदी उद्देश ठेवण्यात आले आहेत. मात्र, ‘आत्मा’च्या माध्यमातून हे प्रयोग करण्यात आले होते. त्यामुळे येथील बाजार समित्यांच्या कार्यपद्धतीत कोणतेही बदल झाले नाही. ते अयशस्वी ठरले असताना आता कोकणातील शेतकर्‍यांसाठी ‘स्मार्ट’चा नवा प्रयोग करण्यात येणार आहे.