Sun, Dec 15, 2019 02:31होमपेज › Konkan › सावंतवाडी-दोडामार्ग ईको सेन्सिटिव्ह झोनमधील 1600 एकरात झाडांची कत्तल!

सावंतवाडी-दोडामार्ग ईको सेन्सिटिव्ह झोनमधील 1600 एकरात झाडांची कत्तल!

Published On: Jun 09 2019 1:48AM | Last Updated: Jun 08 2019 11:02PM
सावंतवाडी : 

सावंतवाडी-दोडामार्ग  या ईको-सेन्सिटीव्ह झोन कॉरिडोअरमधील तब्बल 1600 एकरातील झाडांची कत्तल करण्यात आल्याचा धक्‍कादायक प्रकार उघड झाला आहे.  वनशक्‍ती या समाजसेवी संस्थेने हा प्रकार  उघड केला आहे.

जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणार्‍या कोकणच्या निसर्गाला जमीनदोस्त करण्यात आले आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्त  ठिकठिकाणी विविध कार्यक्रम होत असताना कोकणातून पर्यावरणाला हानी करणारी घटना समोर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी-दोडामार्ग या वाईल्डलाईफ कॉरिडोअरमध्ये सन 2014 सालानंतर ही जंगलतोड करण्यात आली. 2013 साली मुंबई हायकोर्टाने याच भागातील 30 किलोमीटरच्या परिसरात झाडं तोडण्यावर बंदी आणली होती. हा संपूर्ण परिसर कर्नाटकातील भीमागड अभयारण्य ते महाराष्ट्रातील राधानगरी अभयारण्याला जोडणारा आहे. या अभयारण्यात वाघ, हत्ती, रानगवा यांच्यासारखे प्राणी आहेत. त्यामुळे विविध जाती-प्रजातीच्या वनस्पती, विविध पशु-पक्षी असलेल्या या निसर्गसंपन्‍न परिसराची सौंदर्यता आणि संपन्‍नता धुळीस मिळाली आहे.

सन 2013 ते आतापर्यंत पश्‍चिम घाटावरील इको-सेन्सिटिव्ह क्षेत्रातील 103 जागांवर निसर्गाची कशी धुळधाण उडवली गेली आहे, हे वनशक्‍ती या समाजसेवी संस्थेने गुगल मॅपच्या आधार केलेल्या सर्व्हेमध्ये  उघड झाले  आहे. ईको सेन्सिटीव्ह झोनमधील निसर्गसंपन्‍न हिरवीगार जंगले तोडून तो भाग उजाड भकास बनविण्यात आला आहे. याबाबत सावंतवाडी-दोडामार्ग वाईल्डलाईफ कॉरिडोअरमध्ये प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्व्हेक्षण लवकरच केले जाणार आहे.  मात्र  गूगल मॅपद्वारे तुलनात्मक निरीक्षण करुन ही धक्‍कादायक बाब   वनशक्‍तीचे सदस्य  स्टॅलिन दयानंद यांनी समोर आणली आहे. ईको सेन्सिटीव्ह व वाईल्डलाईफ कॉरीडॉरमध्ये अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावरव जंगलतोड होते. तरीही सिंधुदुर्गचे वनखाते कोणतीही पावले उचलत नाही, ही बाब गंभीर नाही.  हा वाईल्डलाईफ कॉरिडॉर नष्ट करण्याचा प्रयत्न  आहे.  राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खासगी वनावर अवैद्य वृक्षतोड होते. यासंदर्भात सरकारने गंभीरतेने कायदे कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कायदा बनविण्याचा दृष्टिकोनातून हालचाली सुरु केल्या आहेत. येत्या एक-दोन महिन्यात नवीन कायदा तयार होणार असल्याचे समजते.