Sat, Dec 07, 2019 14:46होमपेज › Konkan › पुणे-करमळी एक्स्प्रेसमध्ये आढळली 6 संशयास्पद मुले

पुणे-करमळी एक्स्प्रेसमध्ये आढळली 6 संशयास्पद मुले

Published On: Jun 09 2019 1:48AM | Last Updated: Jun 08 2019 11:03PM
कणकवली : प्रतिनिधी

पुणे-करमळी रेल्वे एक्स्प्रेसमध्ये 6 अल्पवयीन मुले शनिवारी सकाळी 11 वा. च्या सुमारास संशयास्पद स्थितीत आढळून आली. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने रेल्वे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या पालकांकडे चौकशी केली असता घरात न सांगता ही मुले निघून गेली आहेत. ट्रॉम्बे  पोलिसात त्यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. त्यांना ताब्यात घेण्यासाठी ट्रॉम्बे पोलिस पालकांसमवेत निघाल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. गोवा येथे मौजमजेसाठी ही मुले जात होती असे तपासात स्पष्ट झाले आहे. 

वाशी ट्रॉम्बे परिसरात राहणारी ही मुले असून घरात पालकांना न सांगता ती निघून गेली. करमळी गोवा येथे जाणार्‍या रेल्वेमध्ये ही मुले पनवेल येथे बसली. घरातून मुले गायब झाल्याने पालकांनी अज्ञाताविरूध्द ट्रॉम्बे पोलिसात त्यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. शनिवारी सकाळी 11 वा. रेल्वे पोलिस भूषण कोचरेकर यांना करमळी एक्प्रेसमध्ये कुडाळ येथे ही सहा मुले संशयास्पदरित्या आढळली. त्यांची चौकशी केली असता समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. म्हणून त्यांनी या मुलांना रेल्वेस्थानकावरील पोलिस चौकीत आणले. रेल्वे पोलिस श्री. कांदळकर आणि श्री. कोचरेकर यांनी त्यांची चौकशी करून घरच्यांशी संपर्क साधला. त्यावेळी ही मुले ट्रॉम्बे परिसरातील असल्याचे स्पष्ट झाले. रेल्वे पोलिसांनी टॉम्बे पोलिसांशी संपर्क साधला. त्यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याने त्या मुलांना सोडू नका, तुमच्याच ताब्यात ठेवा, असे ट्रॉम्बे पोलिसांनी सांगितले.