होमपेज › Konkan › पुण्यातील सहाजणांचा पोलिसांसोबत दरोडा

पुण्यातील सहाजणांचा पोलिसांसोबत दरोडा

Published On: May 13 2018 2:15AM | Last Updated: May 12 2018 11:18PMकुडाळ : वार्ताहर

गेल्या 22 एप्रिल रोजी कुडाळ तालुक्यातील निरुखे येथे रामदास करंदीकर यांच्या घरावर टाकलेल्या छाप्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. दिल्लीवरून छापा टाकण्यासाठी आलेले ते सहाजण पुण्यातील तोतया अधिकारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या तोतया अधिकार्‍यांनी दाखविलेल्या पत्राला बळी पडून सिंधुदुर्गातील सात पोलिसांनी त्यांना सहकार्य केले होते; परंतु तो रितसर छापा नसून  तो दरोडा व फसवणूक होती, असे विभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तसा गुन्हाही पुण्यातील त्या सहाजणांविरोधात कुडाळ पोलिस स्थानकात दाखल करण्यात आला आहे. या बनावट छाप्याच्या घटनेप्रसंगी सहभागी असलेल्या स्थानिक सिंधुदुर्ग पोलिसांची चौकशी सुरू झाली आहे.

22 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक स्वप्निल पोवार यांना सहाजण येऊन भेटले. आपण दिल्लीवरून सरकारी अधिकारी आलो आहोत, निरुखे येथे एका इसमाच्या घरात अवैधरीत्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्‍कम, डिझेल-पेट्रोलचा अवैध साठा केलेला आहे. त्या घरावर आपल्याला छापा टाकायचा आहे, अशी बतावणी करत त्या सहाजणांनी पोवार यांच्यासह 7 पोलिसांना घेऊन ते सर्वजण निरुखे येथील रामदास करंदीकर यांच्या घरावर छापा टाकण्यास गेले. गुन्हा अन्वेषणच्या अधिकारी व पोलिसांना बाहेर हॉलमध्येच ठेवून ते सहाजण घराची झडती घेण्यासाठी आत घुसले. काही वेळाने काही दागिने व रोख रक्‍कम बाहेर आणली, त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिली. यावेळी करंदीकर यांनी ही रक्‍कम आपल्या जांभूळ व्यवसायाची असून ती खर्चासाठी द्या, अशी विनवणी केली. तेव्हा त्यांना 44 हजार रुपये परत करंदीकर यांच्या कपाटात टाकले आणि 1 लाख 85 हजार 710 रुपयांची रक्‍कम सिंधुदुर्ग पोलिसांकडे देऊन पंचनाम्यात दाखविली.
सहाजणांपैकी एकाने काळ्या पिशवीत आणखी रोख रक्‍कम घेऊन ती आपल्यासोबत आणलेल्या इनोव्हा गाडीत ठेवली.

पेट्रोल, डिझेल यांचा पंचनामा करा असे सांगत ते सहाजण इनोव्हा गाडीतून निघून गेले. पोलिसांनी यानंतरची कारवाई सुरू केली. डिझेल, पेट्रोल जप्त केले, करंदीकर यांना ताब्यात घेतले आणि कुडाळ पोलिस स्थानक गाठले. करंदीकर यांना अटक केली, त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. ते घरी गेले. व्यवसायाच्या पावत्या व कागदपत्रांवरून आपल्याकडील रक्कमेचा ताळमेळ घातला तेव्हा त्यांना 5 लाख 50 हजार रूपये त्या सहाजणांनी नेल्याचे लक्षात आले. 1 लाख 85 हजार ही पंचनाम्यातील रक्कम कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. करंदीकर यांनी पोलिस अधीक्षकांना आपला संशय व्यक्‍त करणारा वस्तुस्थिीची कल्पना देणारा अर्ज सादर केला. पोलिस अधीक्षकांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना तपासाच्या सूचना दिल्या.

त्या सहाजणांबरोबर पुणे येथील एक पोलिस खात्यात नोकरीला असलेला पोलिस कर्मचारी होता. तो त्या सहाजणांपैकी तथाकथीत एका माहिती कार्यकर्त्याला सुरक्षा देण्यासाठी नेमण्यात आला होता. सिंधुदुर्ग पोलिसांनी त्या पोलिस कर्मचार्‍यामार्फत त्या सहाजणांचा शोध घेतला. त्यातील दोघे चौकशीला बोलावल्यावर सिंधुदुर्गात आले देखील. इतरांनी लग्न समारंभ असल्याची कारणे दाखवत टाळाटाळ केली. अखेर या सहाजणांविरोधात दरोड्याचा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार श्रीगीत रमेशन, राजबहाद्दर यादव, आनंद सदावर्ते, पुणे ग्रामीण पोलिस स्थानकाचा पोलिस कर्मचारी श्री. मोरे अशी त्यांची नावे आहेत.  पोलिस उपविभागीय अधिकारी दयानंद गवस यांनी ही माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.