Thu, Apr 25, 2019 11:42होमपेज › Konkan › सिंधुदुर्गच्या समुद्रातील दुर्मीळ प्रवाळ धोक्याच्या उंबरठ्यावर!

सिंधुदुर्गच्या समुद्रातील दुर्मीळ प्रवाळ धोक्याच्या उंबरठ्यावर!

Published On: Jan 29 2018 11:22PM | Last Updated: Jan 29 2018 11:10PMसावंतवाडी : दत्ताप्रसाद पोकळे

मालवणसह सिंधुदुर्गच्या समुद्रातील जागतिक दर्जाच्या,अतिशय दुर्मीळ अश्या प्रवाळाची अर्थातच कोरल रिफची वाटचाल नष्ट होण्याच्या दिशेने सुरू झाली आहे. हवामानातील बदलामुळे सिंधुदुर्गातील समुद्राचे तापमान 2 ते 3 डिग्री सेल्सिअसने वाढल्याने 16 टक्के कोरल रिफ मृत झाल्याचे तुतीकोरिन येथील सुगंति देवदसन मरिन रीसर्च इन्स्टिट्यूटने केलेल्या संशोधनातून समोर आले आहे.विशेष म्हणजे यापूर्वी डिसेंबर 2015 मध्ये समुद्री तापमान वाढल्याने मालवण येथील सागरी अभयारण्यानजीकच्या समुद्रातील 8 टक्के प्रवाळ नष्ट झाली होती.

अंदमान- निकोबारसह गल्फ ऑफ मन्नार आणि कोकण किनारपट्टी परिसरात सुगंति देवदसन मरिन रिसर्च इन्स्टिट्यूटकडून हे संशोधन करण्यात आले. या इन्स्टिट्यूटने सिंधुदुर्गच्या समुद्रातील संशोधन संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या मदतीने पूर्ण केले.अलिकडेच याबाबतचा संशोधन अहवाल या इन्स्टिट्यूटने जारी केला आहे.यात मालवण समुद्रातील कोरल रिफची सध्या असलेली गंभीर स्थिती मांडण्यात आली आहे.

हवामानातील बदलांमुळे वैश्‍विक तापमान वाढत असतानाच त्याचा स्वाभाविक परिणाम समुद्री पाण्याचे तापमान वाढण्यात झाला आहे. समुद्राच्या पाण्याचे सरासरी तापमान वाढल्याने मारिन इकोसिस्टमला धक्का बसला आहे. कोरल्स रिफ अत्यंत संवेदनशील असतात. बदलत्या वातावरणाचा किंवा पर्यावरणाचा त्यांच्या वाढीवर चटकन परिणाम होतो. समुद्रामध्ये सूर्याची किरणे ज्या भागापर्यंत थेट पोहोचतात आणि जेथील पाणी जास्त उथळ नसते, त्याठिकाणी सागरी प्रवाळाची निर्मिती होते. सागरी प्रवाळांमध्ये दरवर्षी एक सेंटिमीटरने वाढ होते.मात्र, समुद्राचे तापमान वाढल्याने प्रवाळाची वाढ खुंटली आहे.