Tue, Jul 16, 2019 13:41होमपेज › Konkan › लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू

लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू

Published On: May 15 2018 10:43PM | Last Updated: May 15 2018 10:43PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येथील निवडणूक यंत्रणा जोरदार कामाला लागली आहे. 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर मतदारांची नावनोंदणी आजपासून सुरू झाली असून मतदार यादी बिनचूक व अद्ययावत करण्यासाठी काम हाती घेतले जाणार आहे. गेल्या दोन वर्षांत तब्बल 22 हजार मृत मतदारांची नावे वगळण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘सुलभ निवडणुका’ ही 2019 च्या निवडणुकीची टॅगलाईन असल्याचेही त्यांनी सांगितले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे बोलत होते. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रविण खाडे, निवडणूक नायब तहसीलदार दिप्ती धालवलकर उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचे पुनर्रीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम 15 मे ते  4 जानेवारी 2019 या कालावधीत 5 टप्यात राबविण्यात येणार आहे. त्यानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातंर्गत 1 सप्टेंबरला जिल्ह्याची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यात नवीन मतदारनोंदणी वाढविण्यासह अचूक मतदार यादी तयार करण्याचा उद्देश आहे. या पुनर्रीक्षण कार्यक्रमात प्रामुख्याने मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांचे फोटो घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यात सध्या 99 टक्के मतदार यादी ही छायाचित्र असलेले आहेत. तर 8700 मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नाहीत. त्यासह कृष्णधवल फोटो असलेल्या मतदारांचे रंगीत फोटो घेण्यात येतील. मतदार यादीतील चुका दुरुस्त करणे, मृत, दुबार स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, 18-19 वर्षे वयोगटातील मतदारांच्या नोंदणीसाठी महाविद्यालयात विशेष मोहीम घेण्यात येणार आहे

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे 15 मे ते 20 जून या दरम्यान मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन बीएलओ रजिस्टर अद्ययावत व सखोलपणे पूर्ण करण्याचे काम पाहतील. या भेटीत जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांची मतदार नोंदणी, मृत, दुबार स्थलांतरित यांच्या चुका दुरुस्त करणे, नोंदवहीत याची नोंद घेणे असे कामकाज देण्यात आले असा असणार पुनरीक्षण कार्यक्रम 15 मे ते 20 जून2018 बीएलओ यांच्या घरोघरी भेटीची मोहीम, 21 जून ते 31 जुलै मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण, 1 सप्टेंबर रोजी प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी, 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोंबर रोजी दावे व हरकती स्वीकारणे, 4 जानेवारी 2019 अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे. 

जिल्ह्यात 913 मतदान केंद्रे (भाग) असून यात एकाच कुटुंबात असलेले मतदार एकाच यादीत आणले जाणार आहेत. 913 मतदान केंद्रांपैकी 911 मतदान केंद्रांवर रॅम ची सुविधा उपलब्ध आहेत तर 2 ठिकाणी ही सुविधा नाही. परंतू आगामी निवडणुकीपूर्वी ही संबंधित सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

राजकीय व्यक्तींनी बूथ लेवल असिस्टंट नेमावे निवडणूक विभागामार्फत राबविण्यात येणार मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन मतदार नोंदणी करणे, दुबार व स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे आदी प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे या प्रकियेबाबत वेळीच आक्षेप घेता यावेत किंवा सूचना मांडता यावी यासाठी राजकीय व्यक्तींनी बूथ लेवल असिस्टंट नेमावे, असे आवाहन निवडणूक अधिकारी प्रवीण खाडे यांनी केले आहे.

जास्त अर्ज बीएलओंनी स्वीकारु नये यापूर्वी बीएलओंकडे राजकीय व्यक्तींनी आणून दिलेले मतदार नाव नोंदणी अर्ज स्वीकारले जात होते. मात्र आता निवडणूक आयोगाने या प्रक्रियेत थोडा बदल करत दिवसाला किती अर्ज स्वीकावे याचे निर्बंध घालून दिले आहेत. त्यानुसार एका दिवशी एका बीएलओला राजकीय व्यक्तींकडून जास्तीत जास्त 10 अर्ज स्वीकारावेत त्यापेक्षा जास्त अर्ज स्वीकारु नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.