Wed, Apr 24, 2019 21:57होमपेज › Konkan › सिंधुदुर्गातील शेतकर्‍यांचे दूध महानंदा डेअरी घेणार

सिंधुदुर्गातील शेतकर्‍यांचे दूध महानंदा डेअरी घेणार

Published On: Jun 30 2018 1:17AM | Last Updated: Jun 29 2018 8:36PMकणकवली : प्रतिनिधी

सिंधुदुर्गातील दूध प्रश्‍नाबाबत बुधवारी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या दालनात दुग्धविकास विभागाच्या अधिकार्‍यांसोबत मुंबईत माजी आ. प्रमोद जठार व सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष एम. के. गावडे यांची बैठक झाली. या बैठकीत सिंधुदुर्गातील शेतकर्‍यांचे संकलित केलेले गायीचे दूध महानंदा डेअरी घेणार असल्याचे निश्‍चित झाले. तसेच दूध संघाला उचल म्हणून 25 लाख रु. महानंदाने द्यावे, असे निर्देश ना. जानकर यांनी दिले. केंद्र सरकारच्या मदतीने राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून दूध महासंघ सिंधुदुर्गचे पुनर्वसन करण्याचे ठरविण्यात आले. 

सिंधुदुर्गात सध्या गोकूळ दूध संघाने शेतकर्‍यांकडून दूध घेण्याचे बंद केल्याने जिल्ह्यातील दूध व्यावसायिक, शेतकरी हवालदिल झाला आहे. यामध्ये कुणी राजकारण करू नये, असे आवाहन प्रमोद जठार यांनी केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून जिल्हा दूध संघाने प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली दुग्धविकास मंत्र्यांची भेट घेऊन बैठक आयोजित केली होती. या बैठकीला दुग्धविकास सचिव व सर्व अधिकारी तसेच महानंदा दूध डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक घनश्याम मंगळे, सहसंचालक श्री. वाघ, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी विकास आवटी, दुध संघाचे सचिव श्री. भोसले, दूध संघाचे संचालक श्री. पालकर, सहाय्यक निबंधक आदी उपस्थित होते. सिंधुदुर्गातील दुग्ध व्यवसायास चालना मिळण्याकरिता सर्वोतोपरी मदत करण्याचे निर्देश ना. जानकर यांनी सर्व अधिकार्‍यांना दिले.