Thu, Apr 18, 2019 16:26होमपेज › Konkan › अनपेक्षित सत्काराने भारावले वाहनचालक

अनपेक्षित सत्काराने भारावले वाहनचालक

Published On: Dec 13 2017 1:56AM | Last Updated: Dec 13 2017 1:56AM

बुकमार्क करा

सिंधुदुर्गनगरी ः प्रतिनिधी 

वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई होणे हि नित्याचीच बाब आहे. कधीकधी गांधीगिरीचा अवलंब करत गुलाब पुष्प देवून नियमांचे पालन करा, अशी समज वाहतूक पोलिसांकडून दिली जाते. मात्र वाहतूक नियमांचे पालन करणार्‍या चालकांचा सत्कार केल्यास बेशिस्त वाहतूक करणार्‍यांना चालकांना शिस्तबद्ध वाहतुकीची प्रेरणा मिळेल, या हेतूने  कसाल येथील महामार्ग वाहतूक पोलिस विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक संजय डौर यांच्या कल्पनेतून पोलिस कर्मचार्‍यांनी वाहतूकीचे नियम पाळणार्‍या शेकडो वाहनचालकांचा गुलाब पुष्प देत सत्कार केला. या अनोख्या व अनपेक्षीत सत्कारामुळे  हे वाहन चालक अक्षरशः भारावून गेले. 

अपघातांचे वाढते प्रमाण व त्याच्या परिणामाची तीव्रता कमी करण्यासाठी   महामार्ग पोलिस अधीक्षक रूपाली आंबुरे यांच्या आदेशानुसार जिल्हा वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम मोडणार्‍या चालकांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. महामार्गावर  झाराप ते खारेपाटण दरम्यान ही मोहीम  तीव्र करण्यात आली होती. या कारवाईमुळे वाहनचालकांध्ये सकारात्मक बदल घडून येत आहे. बहुतांशी वाहन चालक नियमांचे पालन करतात. अशा वाहन चालकांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सोमवारी दुपारी  वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय डौर यांच्या नेतृत्वाखाली एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाहतूक नियम पाळणार्‍या शेकडो वाहनचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संदीप गावडे उपस्थित होते.