Fri, Jan 24, 2020 21:43होमपेज › Konkan › पर्यटकांचा फेव्हरेट सिंधुदुर्गचा सावडाव धबधबा (Video)

पर्यटकांचा फेव्हरेट सिंधुदुर्गचा सावडाव धबधबा (Video)

Published On: Jul 18 2019 12:59PM | Last Updated: Jul 18 2019 1:00PM
सिंधुदुर्ग : सचिन राणे

महाराष्ट्रासह इतर राज्यातील पर्यटक वर्षा पर्यटनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुरक्षित धबधबा म्हणून सावडाव धबधब्‍याला हजेरी लावत असतात. कणकवली तालुक्यातील मुंबई - गोवा क्र.66 लगत असणारा सावडाव धबधबा वर्षा सहलींसाठी पर्यटकांना आकर्षित करत आहे. सध्या सावडाव धबधबा पूर्णपणे प्रवाहीत झाला आहे. सुट्टीच्या दिवसा बरोबरच इतरही दिवशीही या धबधब्‍यात मनसोक्‍त भिजण्यासाठी पर्यटकांची उच्चांकी गर्दी होत आहे. 

1975 साली सावडाव गावचे सुपूत्र माजी केंद्रप्रमुख रघुनाथ कामतेकर गुरूजी व ग्रामस्थ यांनी विशेष प्रयत्न करून सावडाव धबधबा प्रकाशात आणला. सावडावच्या खांदारवाडी सीमेवर असलेल्या दिर्बादेवी मंदिराच्या दिर्बा ओहळावर उगम असलेला हा पाझर धबधबा आहे. पूर्वी राजाराणी धबधबा म्हणून ओळखला असलेल्या या धबधब्यावर एका बाजूला स्त्रिया व एका बाजूला पुरूषांना आंघोळ करण्याची व्यवस्था त्यावेळी करण्यात आली होती. म्हणून या धबधब्याला राजाराणी धबधबा म्हणून नाव पडले होते. धबधब्‍याच्या प्रवाहात मधोमध असणारे शंभर वर्षापूर्वीचे अष्टकाचे झाड सर्वांचे लक्ष वेधणारे ठरत आहे. गेली पंधरा वर्षांत प्रसिद्धीच्या प्रकाश झोतात आलेल्या सावडाव धबधब्याचा 2010 साली पर्यटन विकास महामंडळाच्या यादीत क वर्ग पर्यटनस्थळ म्हणून समाविष्ट करण्यात आला. तेव्हापासून सावडाव धबधब्याकडे विशेष लक्ष देवून पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या. सावडाव ग्रामपंचायत व ग्रामस्थ यानी जास्तीत जास्त सुविधा पर्यटकांना आकर्षित करतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सध्या धबधब्याकडे जाण्यासाठी सुसज्ज लोंखडी रॅम्प, बाथरूम, चेंजिग रूम,टॉयलेट, पाणी अशा विविध पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. आतापर्यंत सावडाव धबधब्याच्या परिसरात जाण्यासाठी स्‍ट्रिट लाईट, सावडाव धबधब्याकडे जाणार्‍या स्वागत कमानी ते धबधबा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर झाला असून, हे काम प्रगतीपथावर आहे. ग्रामपंचायत स्तरावरुन सावडाव परीसरात रंगरंगोटी, नळपाणी योजना, स्वच्छता कर्मचारी अशा प्रकार सेवा सुविधा उपलब्ध केल्या आहेत. याचबरोबर जास्तीत जास्त पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहेत, मात्र पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्या म्हणून ओळख असणा-या जिल्ह्यात  शासनाने सावडावकडे विशेष लक्ष दिल्यास पर्यटकांची लक्षणीय वाढ होईल.

संपूर्ण परिसर हिरव्यागार गर्द झाडीने नटलेला असल्याने हे नयनरम्य दृश्यं पाहण्यासाठी मोठया संख्येने पर्यटक येथे भेटी देतात. सुरक्षीत धबधब्‍यामुळे या ठिकाणी पुरूष, महिला, आबालवृद्ध व लहान मुले पर्यटनासाठी हजेरी लावतात. दूरवरचा निसर्ग पाहण्यासाठी उंच मनोर्‍याची उभारणीही या ठिकाणी केली असल्‍याने निसर्गाचे मनमोहक दृष्‍य पाहून पर्यटक तृत्‍प होतात. या निसर्गसंपन्न धबधब्‍यामुळे वर्षा सहलींसाठीचे आनंद लुटण्यासाठी येणा-या पर्यटक व तरुणाईसाठी सावडाव धबधबा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. रविवारी व सुट्टीच्या दिवशी याठिकाणी झुंबड उडालेली असताना सध्या यापुढे दरदिवशी गर्दी वाढत जाणार आहे. 

कसे पोहोचाल...

मुंबई - गोवा महामार्ग क्र.66 पासून सावडाव फाटयावरून 6 कि.मी, नांदगाव ओटव फाटा येथून 9 कि.मी. व कणकवली रेल्वे स्टेशन व बसस्थानकावून 12 कि.मी. अंतरावर सावडाव धबधबा असून या ठिकाणी उंचावरून कोसळणारे फेसाळणारे पाणी त्यामधून नकळत अंगावर उडणारे पाण्याचे तुषार, सभोवतालचा हिरवा निसर्ग यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक गर्दी करायला लागले आहेत. धबधब्याखाली मनसोक्त अंघोळ करून पर्यटक जेवणाचा व येथील उभारण्यात आलेल्या स्‍टॉलवरील खादय पदार्थांचा आस्वाद घेतात. महिला, मुले व वृद्धांना व्यवस्थित पाण्यापर्यंत पोहोचता येते, असा हा सावडाव पाझर धबधबा जिल्ह्यातील सुरक्षित धबधबा मानला जातो. 

सुमारे ७० फूट रुंदीचा आणि तेवढ्याच उंचीचा हा धबधबा कोसळताना पाहणे हा सुखद अनुभव असतो. या धबधब्‍याच्या प्रवाहाच्या बाजूला एक गुहा आहे. शिवाय प्रवाह कोसळतो तिथला तलावासारखा डोह विस्तीर्ण आहे. याचमुळे राज्य व ईतर भागातील कानाकोप-यातून सावडाव धबधब्यावर पर्यटक गर्दी करू लागले आहेत. या धबधब्याचा अजून विकास होण्यासाठी स्थानिक सत्ताधारी व विरोधकांनी महाराष्ट्र शासन व पर्यटन विकास महामंडळ यांच्या माध्यमातून सावडाव परिसराच्या विकासासाठी प्रयत्‍न करणे गरजेचे आहे.

स्थानिक प्रशासन, पर्यटक, स्टॉलधारक यांच्या सावडाव धबधब्या विषयी प्रतिक्रीया :- 

सावडाव धबधबा गेली पंधरा वर्षापूर्वी प्रकाश झोतात आला. या ठिकाणी वर्षा पर्यटनासाठी पर्यटक लांबून येत आहेत. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सावडाव धबधबा महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या यादीत असल्याने येथे पर्यटकांकडून कर भरावा लागतो. यावर्षीपासून येथील जागा दिलेल्या स्थानिकांना मोबदला मिळावा यासाठी पे पार्किंग रूपी कर घेतला जात आहे. या विरोधात काहींनी प्रसिद्धी केली आहे. आज प्रत्येक ठिकाणी पार्किंगसाठी पैसे घेतले जात असताना पर्यटक आनंद लुटण्यासाठी येत असताना हा भुदर्ड त्यांना सोसावा लागतोच. अनेक ठिकाणी जागा देण्या-या नागरिकांना हा मोबदला दिला जातो. यात धबधबा परिसरातील जमिनी दिलेल्या स्थानिकांना विनामोबदला जमिनीचा अशा स्वरूपात मोबदला मिळत आहे.

सावडाव धबधब्‍याची माहिती राज्‍यासह देशभरात पोहचण्यासाठी शासनाने जास्तीत जास्त प्रयत्न करून महाराष्ट्र शासनाने पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून ईतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. या धबधब्याच्या विकासासाठी ग्रामपंचायत स्तरावर खासदार, आमदार यांच्याकडे पाठपुरावा  केला जात असून, शासनाने याची दखल घेवुन  पर्यटनाच्यादृष्‍टीने विकास करावा. 

-दत्ता काटे, उपसपंच, सावडाव

हा धबधबा प्रसिद्ध असल्याने येथे आम्ही आलो आहोत. स्थानिकांचे सहकार्य चांगले असून, प्रत्येक पर्यटकांनी वर्षा पर्यटनासाठी सावडाव येथे नक्की भेट देऊन आनंद लुटला पाहिजे. 

-ॠषीकेश कोंडुसकर, पर्यटक, गोवा

सावडाव धबधबा हा कुटुंबासह वर्षा पर्यटनासाठी आनंद घेण्यासाठी चांगले ठिकाण आहे. अनेक लोक या धबधब्याच्या ठिकाणी वाढदिवस साजरे करण्यासाठी पसंती देतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुरक्षित धबधबा म्हणून सावडाव धबधब्याची पर्यटक निवड करीत आहेत.

-संकेत महाडिक, पर्यटक, बाजारपेठ मित्रमंडळ, तळेरे

सावडाव धबधबा हे ठिकाण अतिशय सुंदर असून पर्यटकांना कोणताही धोका नाही. निसर्ग संपन्न सावडाव वर्षा पर्यटनासाठी उत्कृष्ट नमुना आहे. यामुळे पर्यटकांनी एकदा तरी भेट देवून वर्षा पर्यटनासाठी या ठिकाणाला भेट द्‍यायलाच हवी.

-आनंद महाडिक, पर्यटक, कणकवली

सावडाव धबधबा पर्यटकांना आकर्षित करीत असल्याने अनेक पर्यटक या धबधब्याला भेट देत असल्याने येथील स्थानिक बचतगट व स्‍टॉल धारकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

-विनायक वारंग, स्थानिक व्यावसायिक, सावडाव