Thu, Apr 25, 2019 17:56होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग पोलिस भरती प्रक्रिया पुढे ढकलली

सिंधुदुर्ग पोलिस भरती प्रक्रिया पुढे ढकलली

Published On: Mar 06 2018 10:39PM | Last Updated: Mar 06 2018 10:37PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरातील पोलिस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे 7 मार्चपासून सुरू होणारी मैदानी परीक्षा 12 मार्चपासून सुरू होणार आहे. जिल्ह्यात 71 जागांसाठी होणार्‍या पोलिस भरतीसाठी सुमारे दहा हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती निवासी पोलिस उपअधीक्षक हेमंतकुमार शहा यांनी दिली. 

राज्य शासनाच्या गृह विभागाने राज्यात पोलिस शिपाई भरती प्रक्रिया कार्यक्रम सुरू केला आहे. 31 डिसेंबर 2018 पर्यंत रिक्त होणार्‍या संभाव्य पदांपैकी 75 टक्के रिक्त पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार जिल्हा पोलिस दलाने रिक्त होणार्‍या 53 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करत अर्ज मागविण्यात आले होते. आता मात्र शासनाने 31 डिसेंबर 2018 पर्यंत रिक्त होणारी 100 टक्के पदे भरण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात 53 ऐवजी 71 जागांसाठी पोलिस भरती प्रक्रिया होणार आहे. 
दरम्यान, ही मैदानी परीक्षा 7 मार्चपासून सुरू होणार होती. मात्र, काही कारणास्तव ही भरती प्रक्रिया 12 पासून सुरू होणार आहे. राज्यभरात एकाच वेळी ही भरती प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी या सूचनेची नोंद घ्यावी, असे आवाहन पोलिस विभागामार्फत करण्यात आले आहे. 

भरती करण्यात येणार्‍या 71 पोलिस शिपाई पदांमध्ये खुला प्रवर्ग-24 जागा, अनु. जाती-8, अनु.जमाती-21, विमुक्त जमाती-अ-4, भटक्या जमाती-क-2, भटक्या जमाती-ड-5, विशेष मागास प्रवर्ग-1, इतर मागास वर्ग-6 अशा 71 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. यामध्ये सर्वसाधारण, महिला, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर, पोलिस पाल्य, गृहरक्षक दल यांना काही पदे आरक्षित आहेत. यासाठी पहिल्या दिवशी सकाळी 1000 आणि सायंकाळी 1000 उमेदवारांना आणि दुसर्‍या दिवशीपासून दीड हजार उमेदवारांना सकाळी आणि सायंकाळी बोलविण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी पोलिस उपअधीक्षक हेमंतकुमार शहा यांनी दिली.