Wed, Apr 24, 2019 12:06होमपेज › Konkan › कोकणात येणार्‍या पर्यटकांसाठी पॅकेज

कोकणात येणार्‍या पर्यटकांसाठी पॅकेज

Published On: Jan 10 2018 1:58AM | Last Updated: Jan 09 2018 9:37PM

बुकमार्क करा
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी 

कोकणच्या समृद्ध निसर्ग सौंदर्याला पर्यटकांचा उदंड प्रतिसाद मिळावा, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पर्यटन पॅकेज तयार केले आहे. यामध्ये  पर्यटकांना एक दिवसापासून आठवडाभर पर्यटन सफर करण्याची पर्वणी ‘एमटीडीसी’ने उपलब्ध केली आहे. पॅकेजमध्ये ‘वीकेंड’सारख्या पर्यटन सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच कोकणच्या पारंपरिक लोककला अनुभवण्याची संधी ‘एमटीडीसी’ने पर्यटकांसाठी उपलब्ध केली आहे. 

कोकणातील पारंपरिकता, कौलारू घरे, घरासमोर पडवी, बाहेर अंगण आणि नारळाच्या बागेतील टूमदार घरे पर्यटकांना आजही आकर्षित करतात. सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत बसलेल्या कोकण किनारपट्टीकडे देशी पर्यटकांसह विदेशी पर्यटकही निसर्गाचा आविष्कार पाहण्यासाठी येतात. येथील अथांग समुद्रकिनारा, निळेशार पाणी हे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. त्यात भर पडते ती दर्‍या-खोर्‍यांची आणि त्यातून वाट काढणार्‍या, नद्या तसेच रेल्वे मार्गांची.

गणपतीपुळे या जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळासह वेळास येथील कासव संवर्धन, आंबा महोत्सव, मत्स्य बंदर आणि मासळी या गोष्टीही पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.कोकणातील विलोभनीय समुद्रकिनार्‍यांसह, पर्यटनस्थळांचे व्हिडीओ, मनाला भुरळ घालणारे फोटो, येथील चांगला हंगाम कोणता, यासाठी आता कोकणचे पर्यटन ‘ग्लोबल’ करण्यात आले आहे. कोकणची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी ‘एमटीडीसी’ने संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. यातच आता पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना पॅकेज सफारीची पर्वणी उपलब्ध केली आहे.