Sat, Mar 23, 2019 01:59होमपेज › Konkan › दवाखाने बंद; आपत्कालीन सेवा सुरु

दवाखाने बंद; आपत्कालीन सेवा सुरु

Published On: Jan 03 2018 1:12AM | Last Updated: Jan 02 2018 10:20PM

बुकमार्क करा
सिंधुदुर्गनगरी ः प्रतिनिधी

डॉक्टरांनी 2 जानेवारी रोजी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक 2017 च्या निषेधार्थ डॉक्टरांनी 2 जानेवारी रोजी काळा दिवस म्हणून पाळत 12 तासांचा संप पुकारल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांचे हाल होत आहेत, याबाबत विचारणा केली असता आपले दवाखाने बंद आहेत, मात्र आपत्कालीन रुग्ण सेवा सुरु असल्याचे डॉ. उबाळे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील डॉक्टरांनी  संपावर जात संबंधित विधेयकाच्या निषेधार्थ 2 जानेवारी हा दिवस डॉक्टर काळा दिवस म्हणून पाळला. तसेच याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना सादर करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. इंडियन मेडिकल असोशिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश्‍वर उबाळे, सचिव डॉ. संजय केसरे, डॉ. अजित लिमये, डॉ. संजय निगुडकर, डॉ. जयेंद्र परूळेकर, डॉ. रविंद्र जोशी, डॉ. मिलिंद खानोलकर यांच्यासह मोठ्या संख्येने डॉक्टर उपस्थित होते.

सरकारने सहा आठवड्यांत मागण्या मान्य केल्या नाहीत तर देशव्यापी आंदोलनाचा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे. पत्रकारांशी बोलताना डॉ. राजेश्‍वर उबाळे म्हणाले, मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडिया हे मंडळ कार्यरत असताना नॅशनल मेडिकल कमिशनची आवश्यकता नाही. विशेष म्हणजे हे विधेयक  चर्चेला येण्यापूर्वी एमसीआयच्या छाननी समितीसमोर चर्चेला येणे गरजेचे होते. वैद्यकीय क्षेत्रासाठी नव्याने लागू होणा़र्‍या नॅशनल मेडिकल कमिशनवर डॉक्टरांपेक्षा बिगर वैद्यकीय क्षेत्रातील व राजकीय लोकांना प्रतिनिधीत्व असल्याने त्याला डॉक्टर्सचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.
या विधेयकातील बरेच नियम व अटी वैद्यकीय पेशाच्या नितिमत्तेला धक्का लावणा़र्‍या असून वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेवरही त्याचा परिणाम होणार आहे. देशभरातील केवळ पाच राज्ये या नवीन आयोगावर प्रतिनिधीत्व करणार असून इतर चोवीस राज्यांना संधी दिलेली नाही.

विधेयकावरील तरतूदीनुसार विदेशी डॉक्टरही थेट भारतात येऊन वैद्यकीय पेशा सुरु करू शकतील. शिवाय वैद्यकीय क्षेत्रात भ्रष्टाचाराला वाव  मिळणार आहे. हे  विधेयक लोकसभेत येण्यापूर्वी त्यावर डॉक्टर संघटनांची सविस्तर चर्चा होणे गरजेचे होते. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स व प्रतिनिधींना अंधारात ठेऊन हे विधेयक मांडले जात आहे. त्यामुळे त्या विरोधात मंगळवारी  काळा दिवस पाळण्यात आला आहे. यासाठी आज सकाळी 6 ते सायंकाळी 6 या कालावधीत दवाखाने बंद ठेवून निषेधही केला जात असल्याचे डॉ. उबाळे यांनी सांगितले.