Tue, May 21, 2019 18:14होमपेज › Konkan › सिंधुदुर्गची ओळख आंब्याऐवजी काजू उत्पादक जिल्हा!

सिंधुदुर्गची ओळख आंब्याऐवजी काजू उत्पादक जिल्हा!

Published On: Sep 03 2018 1:39AM | Last Updated: Sep 02 2018 9:39PMकुडाळ : राजाराम परब

आंबा लागवडीपेक्षा काजू लागवडीकडे शेतकरीवर्गाने आता लक्ष वळवले आहे. गेल्या दहा वर्षांत आंबा लागवड क्षेत्रात केवळ 4 हजार 952 हेक्टर, तर काजू लागवडीमध्ये दहा वर्षांत 16 हजार 134 हेक्टरने वाढ झाली आहे. सद्यःस्थितीत आंब्याचे लागवड क्षेत्र 32 हजार 13 हेक्टर, तर काजूचे लागवड क्षेत्र 70 हजार 49 हेक्टर आहे. तर, नारळ लागवड क्षेत्रात 3 हजार 282 हेक्टर, कोेकम लागवड क्षेत्रात 1 हजार 35 हेक्टरने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील या प्रमुख पिकांच्या लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने जिल्ह्याच्या आर्थिक उत्पन्नात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे प्राधान्याने आंबा हे नाव गेल्या कित्येक वर्षांपासून समोर येत आहे. त्यात हापूस आंबा हे ब्रँडनेम जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत निसर्गचक्रात झालेल्या मोठ्या बदलांमुळे जिल्ह्यातील आंब्याची अर्थव्यवस्था कोलमडलेलीआहे. उत्पादनयोग्य आंबा कलमांचा खर्च व उत्पादन यांचा विचार करता मेळ बसत नसल्याने शेतकरी काजू लागवडीकडे वळत आहेत.

सन 2008 मध्ये आंब्याचे लागवड क्षेत्र 27 हजार 61 हेक्टर होते. हेच क्षेत्र 2018 पर्यंत 32 हजार 13 हेक्टरवर आले आहे.  तर काजूचे सन 2008 मध्ये लागवड क्षेत्र 53 हजार 915  हेक्टर होते. हेच क्षेत्र 2018 पर्यंत 70  हजार 49  हेक्टरवर पोहचले आहे. गेल्या दहा वर्षात आंबा लागवड क्षेत्रात केवळ 4 हजार 952 हेक्टर तर काजू लागवडीमध्ये दहा वर्षांत 16 हजार 134 हेक्टरने वाढ झाली आहे.आंब्यापेक्षा काजूचे क्षेत्र चार पटीने वाढले आहे.त्यामुळे या जिल्ह्याची ओळख आता काजू उत्पादक जिल्हा अशी होवू लागली आहे.आंब्याच्या तुलनेत काजू लागवडीचा व देखभालीचा  खर्च कमी असल्यानेच आता काजूची लागवडीची कास शेतकरी वर्गाने धरली आहे.मात्र, नारळ लागवडीकडील कल म्हणावा तसा वाढलेला नाही. नारळ लागवड क्षेत्रात 3 हजार 282 हेक्टरने वाढ झाली आहे.2008 मध्ये नारळ लागवडीचे क्षेत्र 16 हजार 238 हेक्टर वरून 2018 मध्ये हे क्षेत्र 19 हजार 464 हेक्टरवर आले आहे.

गेल्या काही वर्षांत नारळाच्या किंमतीमध्ये म्हणावी तशी वाढ न झाल्याने जिल्ह्यात नारळ लागवडीकडेही शेतकरी वर्गाने दुर्लक्षच केला आहे.मात्र, कोकमची 2008 मध्ये 164 हेक्टवर असलेली लागवड 1 हजार 199 हेक्टरवर पोहचली आहे.कोकम लागवडीत आठ पटीने वाढ झाली आहे.सुपारीचे 2008 मधील 754 हेक्टर क्षेत्र  2018 मध्ये 1 हजार 323 हेक्टर एवढे झाले आहे. फणसाचे क्षेत्र 189 हेक्टरवरून 274 हेक्टर झाले आहे.चिकूचे 207 हेक्टर क्षेत्र  247 हेक्टर झाले आहे.आवळाचे 78 हेक्टर क्षेत्र 88 हेक्टर झाले आहे. पपईचे 54  हेक्टर क्षेत्र 173  हेक्टर झाले आहे. अननसाचे 40  हेक्टर क्षेत्र 353 हेक्टर झाले आहे. यात बरीच वाढ झाली आहे.जांभूळाचे 12  हेक्टर क्षेत्र 19 हेक्टर झाले आहे.केळीचे 221 हेक्टर क्षेत्र 634 हेक्टर झाले आहे. त्यामुळे आंबा काजू नारळ उत्पादक असणारा जिल्हा आता इतर अनेक फळ पिकांच्या लागवडीत अग्रेसर ठरत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.