होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात माघी गणेश जयंती भक्‍तिमय वातावरणात

सिंधुदुर्गात माघी गणेश जयंती भक्‍तिमय वातावरणात

Published On: Jan 22 2018 1:24AM | Last Updated: Jan 21 2018 10:28PMकणकवली : प्रतिनिधी

सिंधुदुर्गात रविवारी सर्वत्र माघी गणेश जयंती विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी भक्‍तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या गणरायाच्या मूर्तींची ठिकठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आली होती. या माघी गणेश जयंतीमुळे संपूर्ण जिल्हा गणेशमय झाला होता.  कोकणात गणेश चतुर्थीचा उत्साह मोठा असतो. त्याच उत्साहात माघ महिन्यात येणारी माघी गणेश जयंतीदेखील मोठ्या उत्साहाने आणि व्यापक स्वरूपात साजरी केली जाते. विविध राजकीय, सामाजिक मंडळांच्या वतीने ही जयंती साजरी होते.

तसेच अनेक गणेश मंदिरांमध्ये माघी गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.  रविवारी सर्वत्र माघी गणेश जयंतीचा माहोल होता. सकाळपासूनच श्री गणेश वंदना आणि गणपतीची गाणी ध्वनिक्षेपकावर ऐकू येत होती. यानिमित्त सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद, भजने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कणकवलीत उपजिल्हा रुग्णालयासमोर सिद्धिविनायक मित्रमंडळाच्या वतीने माघी गणेश जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली.