Wed, Mar 20, 2019 02:33होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात किनारपट्टीला मुसळधार पावसाचा तडाखा

सिंधुदुर्गात किनारपट्टीला मुसळधार पावसाचा तडाखा

Published On: Jun 20 2018 10:34PM | Last Updated: Jun 20 2018 10:34PMसिंधुदुर्ग : प्रतिनिधी

बुधवार पहाटेपासून कोसळणार्‍या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. विशेषतः किनारपट्टी भागात पावसाचा जोर असल्याने या भागाला पावसाचा तडाखा बसला. पावसामुळे किनारपट्टीवरील मालवण, वेंगुर्ले, देवगड या शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. या शहरांतील सखल भागांत पाणी घुसल्याने नागरिक व व्यापार्‍यांची तारांबळ उडाली. तर ग्रामीण भागातील अनेक मार्ग पाण्याखाली गेल्याने संपर्क खंडित झाला. अनेक ठिकाणी घरांवर झाडे पडण्याच्या घटना घडल्या. पावसामुळे वीज व दूरध्वनी यंत्रणाही प्रभावित झाली होती.

गेले दोन दिवस जिल्ह्यात संततधार पाऊस पडत आहे. बुधवारी पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. सह्याद्री पट्ट्यात पाऊस विश्रांती घेऊन पडत होता. तर किनारी भागात तो संततधार कोसळत होता. बुधवारी पहाटेपासून सुरू झालेला हा पाऊस सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होता. पावसामुळे वेंगुर्ले शहरातील हॉस्पिटल नाका, खर्डेकर महाविद्यालय, राऊळवाडा, पिराचा दर्गा, रामेश्‍वर मंदिर आदी भाग जलमय झाल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. निवतीमेढा मार्गावरील पूल खचल्याने या भागाचा संपर्क खंडित झाला आहे. तर खवणे गाबीतवाड्यात पाणी घुसल्याने सात कुटुंबे बाधित झाली. तर याच गावातील रामा मूनकर यांच्या घराची भिंत कोसळली. मालवण शहरातील अनेक भागांत दुकाने व घरांमध्ये पाणी घुसले. तालुक्यातील बिळवस गावातील संजय पालव यांच्या घरावर सुमारे 40 फूट लांब व 12 फूट उंच अशी दरड कोसळून त्यांच्या घराची पडवी जमीनदोस्त झाली. सुदैवाने या घटनेत अनर्थ टळला. हेदूळ-खामवाडी पुलाला भगदाड पडल्याने मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली. देवबाग मार्गावर मोंडकरवाडी येथे झाड पडल्याने वाहतूक काही काळ खंडित झाली होती. खैदा-कातवड भागातही पाणी घुसले होते. 

देवगड तालुक्यातही मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. तालुक्यातील अनेक मार्ग पाण्याखाली गेल्याने तालुक्याच्या ग्रामीण भागाचा संपर्क तुटला होता. कुणकेश्‍वर-चांदेलवाडी भागातील काही घरांमध्ये पाणी घुसले. तर दहीबाव-कुणकेश्‍वर मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. जामसंडे-भटवाडी येथील अनंत चिंदरकर यांच्या घराची भिंत कोसळून काही कोंबडया गाडल्या गेल्या. 

जिल्हयाच्या कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी या तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. मात्र पाऊस विश्रांती घेवून पडत असल्याने या भागातील जनजीवन फारसे प्रभावीत झाले नाही.