होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : महामार्गावरून कुडाळवासीयांचा आंदोलनाचा इशारा

सिंधुदुर्ग : महामार्गावरून कुडाळवासीयांचा आंदोलनाचा इशारा

Published On: Apr 21 2018 11:15PM | Last Updated: Apr 21 2018 11:03PMकुडाळ ः प्रतिनिधी

झाराप ग्रामस्थांनी महामार्गाचे जे काम सुरू आहे त्याबाबत आवाज उठविला असतानाच आता कुडाळवासीयही एकत्र आले आहेत. कुडाळ पं.स. कार्यालयात यासंबंधी शनिवारी खास बैठक घेण्यात आली. झाराप ते कसालमधील  जनतेच्या सुविधांबाबत संबंधित यंत्रणेने लक्ष द्यावा, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात महामार्ग चौपदरीकरणाचा थ्री-डी आराखडा उपलब्ध करून द्यावा, या मागण्यांचे निवेदन ग्रामस्थ दोन दिवसात जिल्हाधिकार्‍यांना देतील आणि  निवेदनातील मागण्यांचा संबंधित यंत्रणेने दिलेल्या मुदतीत विचार न केल्यास जनआंदोलन उभारण्यात येईल, असा निर्णय या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीत प्रकल्पबाधित क्षेत्रातील सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या अडचणी सांगितल्या. प्रामुख्याने येथील जनतेचा उदरनिर्वाह शेतीवर होत असल्याने ठिकठिकाणी अंडरपास, पाणी निचर्‍यासाठी मोर्‍या, बॉक्सवेल उपलब्ध करून देणे, तसेच प्रामुख्याने सर्व्हिस रोड देणे आवश्यक आहे. तशी मागणी या बैठकीत करण्यात आली. अखेर या सर्व लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार झाराप ते कसाल दरम्यान रस्ता कामाच्या ठिकाणी सुरक्षितता महत्त्वाची आहे. जिल्हाधिकार्‍यांनी कार्यालयात हायवे प्रकल्पाची थ्रीडी उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून  स्थानिकांच्या  मागणीचा विचार करून योग्य ते बदल  सुचविण्यात येतील, याबाबतचे निवेदन  दोन दिवसांत जिल्हाधिकार्‍यांना देण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान सोमवार सायंकाळपर्यंत झाराप ते कसाल दरम्यान प्रकल्पबाधित ग्रामस्थांनी आपले वैयक्‍तिक किंवा सार्वजनिक विषयातील अडचणी लेखी स्वरूपात कुडाळ सभापती राजन जाधव यांच्याकडे सादर कराव्यात,असे आवाहन यावेळी उपस्थितांनी केले. 

 सभापती राजन जाधव, जि.प. सदस्य संजय पडते, जि.प. उपाध्यक्ष रणजित देसाई, सौ. श्रेया परब, भाजपा प्रवक्‍ते काका कुडाळकर, राष्ट्रवादीचे अमित सामंत,  अमरसेन सावंत, आबा मुंज, अभय शिरसाट,  बबन बोभाटे, शिवसेना तालुकाप्रमुख  राजन नाईक,  मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, अतुल बंगे, बाबल गावडे, सौ. स्वप्ना वारंग, संदेश नाईक, संजय भोगटे, राजन नाईक, बाळा कोरगांवकर, श्री. आंगणे आदी शिवसेना-भाजपा, काँग्रेस, स्वाभिमान, मनसे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.