होमपेज › Konkan › ब्लॉग : कोकणात राणे-राऊत-प्रभू तिरंगी लढत?

ब्लॉग : कोकणात राणे-राऊत-प्रभू तिरंगी लढत?

Published On: Feb 09 2018 2:00AM | Last Updated: Feb 09 2018 2:00AMरत्नागिरी : प्रतिनिधी

बरोबर वर्षभरानंतर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे. गेल्यावेळी 2014 या वषार्ंत झालेली लोकसभा निवडणूक तळकोकणाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरली होती. तत्पूर्वी तब्बल 20 वर्षे कोकणच्या राजकारणात सतत दबदबा ठेवलेल्या स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपूत्र, माजी खासदार नीलेश राणे यांना त्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी ती निवडणूक जिंकल्याने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे स्वतः तातडीने हेलिकॉप्टर घेऊन रत्नागिरीत खा. राऊत आणि शिवसैनिकांचे कौतुक करण्यासाठी आले होते. त्यानंतर आता 4 वर्षांचा कालावधी पार पडला आहे. राजकारणात अनेक बदल झाले आहेत. आता पुन्हा वर्षभरात लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्याच्या राजकारणाची स्थिती पाहता ही निवडणूक रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तिरंगी होईल अशी शक्यता आहे. 

2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेची युती होती. कोकणात भाजपपेक्षा शिवसेनेेचीच ताकद अधिक होती.त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला होता. कदाचित यावेळीही युती झाली तर हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेलाच मिळेल यात शंका नाही. महाराष्ट्रातील शिवसेनेचा कोकण हा ‘बेस’ आहे त्यामुळे तो राखण्याची स्ट्रॅटेजी शिवसेनेकडून अवलंबिली जाणार हे निश्‍चित आहे. शिवसेना आणि भाजप सध्या सत्तेत मित्रपक्ष असतानाही लोकांच्या नजरेत तरी हे दोन्ही पक्ष शत्रूसारखे वागताना दिसत आहेत. शिवसेनेकडून स्वतंत्रपणे लढण्याची भाषा सुरू झाली आहे. त्यामुळे शिवसेनाही राष्ट्रीय लोकशाही आघाडीची ‘अलायन्स पार्टी’ नाही राहिली तर या मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत आणि भाजपकडून केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू रिंगणात असू शकतात. 

नारायण राणे यांनी काही वर्षांपूर्वी यापुढे आपण लोकसभेत जाणार असे सूतोवाच पत्रकारांशी गप्पा मारताना केले होते. पण नंतर बहुधा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजकारणात अधिक लक्ष राहिल्याने लोकसभेत जाण्याचा विचार करता आला नसेल. पण यावेळी मात्र, राणे स्वतः लोकसभा निवडणूक रिंगणात उतरू शकतात, असे राजकीय निरीक्षकांना वाटते आहे. खा. विनायक राऊत यांनी ‘राणे यांनी लोकसभा निवडणुकीत उतरावेच’ असे आव्हान यापूर्वीच दिले आहे. तशी लढत झालीच तर ती मात्र खूपच लक्षवेधी ठरेल. राणे आणि शिवसेना एकमेकांना कसे भिडतात हे पुन्हा एकदा पहायला मिळेल. पण राणे स्वतः निवडणुकीत नाही उतरले तर माजी खासदार नीलेश राणे हे स्वाभिमान पक्षाचे उमेदवार असू शकतील, यात शंका नाही. बाकी राष्ट्रवादी काँग्रेस आपली आघाडी काँग्रेससोबत करून मोकळी होईल यातही शंका नाही. त्यामुळे काँग्रेसही आपला उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. काँग्रेसचे नेतृत्व अर्थातच खा. हुसेन दलवाई यांच्याकडे असेल. 

गेल्यावेळच्या निवडणुकीत मोदी लाट होती. त्यावेळी मोदी लाटेतही राणे आपला बालेकिल्ला राखतील, असा अंदाज व्यक्‍तहोत होता. पण तब्बल 1 लाख 43 हजार मताधिक्क्याने शिवसेनेचा विजय झाला. एवढे मोठे मताधिक्य लक्षात घेता जरी मोदी लाट नसती तरी शिवसेनेचा विजय निश्‍चित होणार होता.थोडे मताधिक्य कमी झाले असते, असे मत तेव्हा राजकीय निरीक्षकांनी नोंदवले होते. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यापेक्षा रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना संघटना मजबूत आहे. परंतु 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे खा. विनायक राऊत यांना सर्वाधिक 39,821 इतके मताधिक्य सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून मिळाले होते. सध्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यासाठी मेहनत घेतली होती. या लोकसभा मतदारसंघातील सहा  विधानसभा मतदारसंघांपैकी कणकवली मतदारसंघ वगळता उर्वरित पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये खा. विनायक राऊत यांना मताधिक्य मिळाले होते. कणकवलीमध्ये नीलेश राणे यांना 3,123 इतके मताधिक्य मिळाले होते. अर्थात सिंधुदुर्गपेक्षा रत्नागिरीत जास्त म्हणजेच 86,890 इतके मताधिक्य शिवसेनेला मिळाले होते. सिंधुदुर्गात 56,282 इतके मताधिक्य होते. आताही कणकवली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार नितेश राणे आहेत. उर्वरित चारही मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेसाठी येणार्‍या लोकसभा निवडणुकीत मोठे  बळ आहे. अर्थातच लोकसभा निवडणुकीत विद्यमान आमदार आपआपल्या उमेदवारीसाठी परिश्रम घेणारच. कारण त्यापुढील 4 महिन्यात होेणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी ते परिश्रम उपयोगी पडणार आहेत.