होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : पोलिस उपनिरीक्षक निलंबित

सिंधुदुर्ग : पोलिस उपनिरीक्षक निलंबित

Published On: May 15 2018 1:35AM | Last Updated: May 14 2018 11:06PMसिंधुदुर्गनगरी ः प्रतिनिधी

निरूखे येथील रामदास करंदीकर यांच्याकडे धाड टाकणार्‍या ‘स्पेशल छब्बीस’ या बोगस अधिकारी पथकाला सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मदत केल्याचे झालेल्या चौकशीत उघड झाले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. मुख्यालयातील सायबर सेल शाखेचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल पवार यांना निलंबित केले आहे तर उर्वरित आठ पोलिस कर्मचार्‍यांची खातेनिहाय चौकशी सुरू झाली असल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. 

कुडाळ येथील व्यापारी रामदास करंदीकर यांच्या निरूखे येथील निवासस्थानी केंद्रीय आयकर अधिकारी असल्याचे भासून पोलिसांसमवेत त्या बोगस पथकाने धाड टाकून सुमारे साडेसात लाखांचा दरोडा घातला होता. हा दरोडा सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाला सोबत घेऊन त्यांच्या डोळ्यादेखत घातला होता. त्यासाठी आपण दिल्लीतील वरिष्ठ अधिकारी असल्याचे त्या तोतया पोलिसांनी सिंधुदुर्गातील पोलिसांना भासवले होते. ही घटना 22 एप्रिल रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली होती. 

यात करंदीकर यांना अवैध रक्‍कम, डिझेल व पेट्रोलचा साठा करणे या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. बनावट अधिकार्‍यांनी पोलिसांच्या सहाय्याने घराची झाडाझडती घेतल्यानंतर पंचनामा करण्यासाठी पोलिसांना रोख 1,85,710 रुपये दाखविण्यासाठी दिले.त्यानंतर पोलिसांना पुढील कारवाई करा असे सांगत तिथून उर्वरित सुमारे साडेपाच लाखाची रक्‍कम घेवून पोबारा केला. यानंतर खर्‍या पोलिसांनी करंदीकर यांच्या घराबाहेरील पेट्रोल व डिझेलची कॅन व ही कॅन ठेवलेली महिंद्रा पीकअप यांचा पंचनामा करून करंदीकर यांच्या विरोधात कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

23 एप्रिल रोजी करंदीकर हे जामिनावर सुटल्यावर पंचनाम्यात सुमारे साडेपाच लाख रुपये एवढी रक्‍कम दाखविण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे अवाक् झालेल्या करंदीकर यांनी पोलिस अधीक्षकांकडे धाव घेत चौकशी करण्याची मागणी केली. यानुसार पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी चौकशी केली असता हा छापा नसून बनावट अधिकारी बनून आलेल्या टोळीने पोलिसांना फसवून घातलेला दरोडा असल्याचे निष्पन्‍न झाले. या टोळीने करंदीकर यांना खर्चासाठी कपाटात 44 हजार रुपये ठेवले होते हे चौकशीत निष्पन्‍न झाले.

जिल्हा पोलिस विभागाचे नाक कापणार्‍या या घटनेची जिल्हा पोलिस अधीक्षकांनी गंभीर दखल घेतली असून राज्यभर खळबळ माजवलेल्या या दरोड्यातील प्रमुख आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत.