Mon, May 27, 2019 01:13होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात पट्टेरी वाघाचे अस्तित्व पुन्हा अधोरेखित

सिंधुदुर्गात पट्टेरी वाघाचे अस्तित्व पुन्हा अधोरेखित

Published On: Jun 11 2018 1:06AM | Last Updated: Jun 10 2018 10:33PMसावंतवाडी : दत्तप्रसाद पोकळे 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पट्टेरी वाघाचे अस्तित्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. नुकत्याच झालेल्या व्याघ्रगणनेत दोडामार्ग तालुक्यातील तिलारी पर्वतरांगा, गोव्यातील म्हादई व कर्नाटकातील भीमगड परिसरात पट्टेरी वाघाच्या पाऊलखुणा पगमार्क व वाघाच्या अस्तित्वाचे अन्य पुरावे आढळून आले आहेत. दोडामार्गनजीक असलेल्या म्हादई अभयारण्यात तर पट्टेरी वाघ कॅमेरा ट्रॅपमध्ये बंदिस्त झाला आहे. मुख्य म्हणजे या परिसरातील वाघाच्या अस्तित्वाबाबत वन विभागाच्या अधिकार्‍यांनीही पुष्टी केली आहे.

जिल्ह्यातील आंबोलीपासून मांगेलीपर्यंतचा पश्‍चिम घाटाचा पट्टा वाघांचा कॉरिडॉर मानला जातो. राधानगरी ते भीमगड या सह्याद्री वाईल्डलाइफ कॉरिडॉरचा भाग असलेल्या या  पट्ट्यात अनेक वेळा  वाघाचे अस्तित्व आढळले आहे.  मात्र वाघाचे अस्तित्व दाखवले तर परमोच्च सुरक्षिततेची अतिरिक्‍त जबाबदारी येईल. यामुळे तसेच काही प्रस्तावित खनिज प्रकल्पांमुळेही वन विभागाने अनेकदा वाघाचे अस्तित्व दडपले होते. दाभिल ते मांगेली या परिसरात अनेकदा ग्रामस्थांना वाघाचे दर्शनही झाले होते. या पार्श्‍वभूमीवर येथील वाघाच्या अस्तित्वाबाबत सखोल संशोधन करण्याची मागणी सातत्याने होत होती.

दरम्यान, पुणे येथील वन्यजीव तज्ज्ञ गिरीश पंजाबी यांनी गतवर्षी वन विभागाच्या साहाय्याने दोडामार्ग तालुक्यातील तिलारी परिसरात कॅमेरा ट्रॅप व अन्य पद्धतीने केलेल्या वन्यजीवांच्या अभ्यासात पट्टेरी वाघाचे अस्तित्वही कॅमेराबद्ध झाले होते.यांनतर राज्याचा वनविभाग खडबडून जागा झाला होता.वन विभागाच्या काही वरिष्ठ अधिकार्‍यांनी या घटनेनंतर तिलारी परिसराची पाहणीही केली होती. याबाबतचा अहवालही शासनाजवळ उपलब्ध आहे. मात्र, त्यांनतर या परिसरात वाघाच्या अस्तित्वाबाबत वन विभागाने कोणतीही कार्यवाही केली नसतानाच आता पुन्हा एकदा तिलारी परिसरात वाघाचे अस्तित्व समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी संपूर्ण देशात अखिल भारतीय व्याग्र गणना करण्यात आली होती. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण,वन विभाग तसेच अनेक वन्यजीव तज्ज्ञांचा सहभाग असलेली ही व्याघ्र गणना सिंधुदुर्ग जिल्ह्यातही करण्यात आली होती.

या व्याघ्र गणनेनुसार गोव्यातील म्हादई अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वाघाचे अस्तित्व आढळले आहे.तर जैविक घटकांच्या अनुकूल स्थितीमुळे दोडामार्ग तालुक्यातील तिलारी पर्वतरांगा व कर्नाटकातील भीमगड परिसरातहि पट्टेरी वाघांनी आपले अधिवास निर्माण केल्याचे समोर आले आहे. कर्नाटकातील डोंगाओ, शिरोली, पोस्टोली, कांगला, चापोली, अमगा, चिखले, चापगो ते चोरला घाट या तिलारी व म्हादई परिसरानजीक असलेल्या भागातही वाघाचे अस्तित्व कॅमेरा बद्ध झाले आहे.मुख्य म्हणजे या परिसर राधानगरी ते भीमगड वाइल्डलाइफ कॉर्रिडॉरचा भाग आहे.तिलारी परिसरातील जैवसंपन्न घनदाट जंगल वन्यजीवांसाठी अनुकूल घनत्व प्रदान करते,त्यामुळे वाघांनी म्हादई व भीमगड परिसराशी संलग्‍न अशा तिलारी परिसरात अधिवास बनवले आहेत,जे वाघांच्या संरक्षणासाठी महत्वपूर्ण आहेत,असे वन्यजीव तज्ज्ञ गिरीश पंजाबी यांनी सांगितले.