Wed, May 22, 2019 10:15होमपेज › Konkan › जिल्ह्यात आज फक्त जेलभरो

जिल्ह्यात आज फक्त जेलभरो

Published On: Aug 08 2018 10:32PM | Last Updated: Aug 08 2018 10:18PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

सकल मराठा समाजाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 9 ऑगस्ट रोजी जेल भरो आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पाश्‍वर्र्भूमीवर लोकांमध्ये असलेली संभ्रमावस्था दूर करण्यासाठी बुधवारी सकल मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक डॉ. सुहास सावंत आणि या आंदोलनातील त्यांचे इतर सहकारी यांचेशी सविस्तर चर्चा  निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी केली. चर्चेच्या दरम्यान गुरुवार 9 ऑगस्ट 2018 रोजी होणार्‍या मराठा आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात पुकारण्यात आलेल्या जेल भरो आंदोलनाबाबत डॉ. सुहास सावंत यांनी सविस्तर माहिती दिली. दरम्यान, गुरुवारी जिल्ह्यातील सर्व दुकाने, बाजार, वाहतूक सेवा या सुरळीत सुरू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. 

डॉ. सावंत म्हणाले, जिल्ह्यात 9 ऑगस्ट रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने जेलभरो आंदोलन केले जाणार आहे. तथापि, या आंदोलनामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, होऊ देणार नाही,  हे केवळ जेलभरो आंदोलन असून  सकल मराठा समाज मोर्चाच्या वतीने कोणत्याही प्रकारे जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली नाही. या सेवा विस्कळीत होण्यासाठी कोणत्याही प्रकारे मराठा आंदोलकांकडून कार्यवाही केली जाणार नाही. एस.टी. विभागान नेहमीप्रमाणे आपली वाहतूक सुरू ठेवावी.  एस.टी. सेवा बंद पाडणे, रस्तावर झाडे टाकून वाहतूक आडविणे, टायर जाळणे आशा प्रकारचे कोणतेही प्रकार आंदोलनकर्त्यांकडून होणार नाहीत, असे आश्‍वासन आपण देत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून त्यांना परीक्षेच्या ठिकाणी सुरळीतपणे व वेळेत जाणे व येण्यासाठी एस.टी.ची सेवा सुरळीत सुरू राहणे आवश्यक आहे. ही सेवा विस्कळीत होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना पत्राद्वारे केली आहे. एस.टी. प्रशासनाने आपली सेवा नेहमीसारखी सुरू ठेवावी. रात्री मुक्कामाला ग्रामीण भागामध्ये एस.टी. जिथे जात असेल तिथे नेहमीप्रमाणे पाठवावी. याउलट, बससेवा बंद केली तर जनतेला त्रास होऊन, त्यामुळे नाराजी वाढेल. त्यामुळे एस.टी. महामंडळाने कोणत्याही प्रकारची बससेवा रद्द करू नये किंवा सर्वसामान्यांना त्रास होईल, असे करू नये, अशी भूमिका सकल मराठा समाजाच्या वतीने सुहास सावंत यांनी मांडली.

 जेलभरो आंदोलन शांततामय पद्धतीने आणि लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने पार पाडण्यात येणार आहे. या आंदोलनात कोणत्याही प्रकारे हिंसेला थारा दिला जाणार नाही. जिल्ह्यातील नागरिकांसाठी उद्या सर्व प्रकारच्या सेवा सुविधा, बाजार, शाळा, दुकाने इत्यादी नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.

उद्याच्या आंदोलनातून सर्वसामान्य जनतेला त्रास झाल्यास सकल मराठा समाजाची प्रतिमा खराब होईल व समाजाच्या बाबतीत लोकांमध्ये नकारात्मक मत तयार होईल व तसे आम्हास होवू द्यायचे नाही असे मत सकल मराठा समाजाच्या पदाधिकार्‍यांनी यावेळी मांडले. सकल मराठा समाजाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये या संदर्भात त्यांनी घेतलेली ही सकारात्मक भूमिका अभिनंदनीय आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सकल मराठा समाजाच्या उद्याच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी लोकांसाठी केलेल्या या आवाहनाकरिता विजय जोशी, अप्पर जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी यावेळी आभार मानले.