Tue, Jun 25, 2019 21:31होमपेज › Konkan › आंजिवडे-भैरीची पाणंद घाटमार्ग सिंधुदुर्गचा भविष्यकाळ!

आंजिवडे-भैरीची पाणंद घाटमार्ग सिंधुदुर्गचा भविष्यकाळ!

Published On: Feb 08 2018 1:47AM | Last Updated: Feb 07 2018 9:48PMदुकानवाड ः शंकर कोराणे

आंजिवडे जवळील भैरीची पाणंद घाट अस्तित्वात आल्यास कोल्हापूर - वेंगुर्ले बंदर हे अंतर 115 किमीने कमी होणार असून  या घाटाने  कोल्हापूर-मालवण किल्‍ला (कुडाळ नेरूरपार खाडीमार्गे)  हे अंतर केवळ 135 किमी असणार  आहे.या घाटमार्गामुळे वेळ आणि इंधनाची बचत होणार असून या बाबींचा विचार करूनच बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आंजिवडे - पाटगाव घाटाच्या सर्व्हेक्षणाचे आदेश सा.बां.विभागाला दिले आहेत.

या घाटापासून तीस  किमी अंतरावर घोटगे-जांभवडे घाट अंतिम टप्प्यात असून तो नजिकच्या काळात पूर्ण होईल.भैरीची पाणंद घाट फोडल्यास आंजिवेतून थेट शिवापूरला जाता येणार असून यासाठी केवळ पाच -सहा किमीचा रस्ता तयार करावा लागणार आहे.तसे झाल्यास सांगेली, शिरशिंगे खोरे हे गाव या घाटाच्या जवळ येवू शकतात. भैरीची पाणंद घाट झाल्यास कोल्हापूर-सावंतवाडी अंतर 45 किमीने तर कोल्हापूर - गोवा (झारापमार्गे)अंतर 40 किमीने कमी होणार आहे.तसेच कोकणातील माणगाव तर घाटावरील गारगोटी  शहरांचा जलद विकास, मौनी महाराजांचे पाटगाव व माणगावातील प्रख्यात दत्तमंदिर  क्षेत्र या घाटमार्गामुळे पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येणार आहे.तसेच घाटमाथ्यावरील लाखो भक्‍तांचे श्रध्दास्थान असलेले केरवड्याचे सिध्द महादेव मंदिर,आदमापूरचे बाळू मामा तिर्थक्षेत्र याच मार्गावर येणार असून घाट झाल्यास सह्याद्रीच्या रांगातील असंख्य उजेडात न आलेले धबधबे  प्रकाशझोतात येणार आहेत.

लवकरच ठिकठिकाणी होणार मेळावे

पाटगाव धुरीवाडी ते आंजिवडे - भैरीची पाणंद असा घाट फोडण्याबाबत लोकांमध्ये प्रबोधन व्हावे, यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात पाटगाव, कडगाव व गारगोटी येथे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात माणगांव व दुकानवाड येथे मेळावे घेण्यात येणार असल्याचे समजते.