Wed, Apr 24, 2019 02:20होमपेज › Konkan › भावी पिढीत वाचनाची आवड  निर्माण करा : वैद्य

भावी पिढीत वाचनाची आवड  निर्माण करा : वैद्य

Published On: Mar 05 2018 8:51PM | Last Updated: Mar 05 2018 8:31PMबांदा : वार्ताहर

या धावपळीच्या युगात युवा पिढीही वेगवान झाली आहे. पुस्तके वाचण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो किंबहुना त्यांचा वाचनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निरस झाला आहे. शाळेत शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व पटवून देत वाचनाची गोडी लावणे गरजेचे आहे. शिक्षक, शाळा आणि ग्रंथालये यांनी यात पुढाकार घेत भावी पिढीला वाचनाची आवड लावली तरच ही वाचन संस्कृती टिकून राहील, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष अनंत वैद्य यांनी बांदा येथे केले.

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व नट वाचनालय बांदा  आयोजित  जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन बांदा येथील नट वाचनालयाच्या संत सोहिरोबनाथ नगरीत झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरून अनंत वैद्य बोलत होते. या अधिवेशनाचे उद्घाटन माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, बांदा सरपंच मंदार कल्याणकर, मानसोपचार तज्ज्ञ तथा साहित्यिक डॉ.रुपेश पाटकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती श्रेया गोखले, कार्यवाह मंगेश मसके, जि. प.सदस्या सौ.श्‍वेता कोरगावकर, पं. स.सदस्य शीतल राऊळ, कुडाळच्या नगरसेविका उषा आठल्ये, बांदा व्यापारी संघाचे सचिव सचिन नाटेकर, नट वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर आदी उपस्थित होते.सकाळी  बांदा शहरातून ग्रंथदिंडी काढून या अधिवेशनाची सुरुवात झाली.

अनंत वैद्य म्हणाले,आज शिक्षण क्षेत्रात केवळ पुस्तकी ज्ञान दिले जाते. शिक्षणाचे धडे देणार्‍यांनीही इतिहासाची पाने चाळली असतील असे दिसून येत आहे. त्यामुळे या भावी पिढीला वाचनासाठी प्रवृत्त करणार कोण? हा प्रश्‍नच आहे, अशी खंत व्यक्‍त केली. वाचनालय किंवा ग्रंथालये चालविताना सर्वांचे सहकार्य आवश्यक असून शिक्षण क्षेत्रातही या वाचनाचा प्रसार होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्‍त केले.

प्रमोद कामत म्हणाले, पुस्तके मानवी जीवनाला दिशा देण्याचे काम करीत असल्याने वाचनालय हे जीवनात महत्वाचे आहे.त्यामुळे वाचनालय बंद न पडता ते अखंडित चालू रहावे यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. रणजित देसाई म्हणाले, जिल्ह्यातील विविध वाचनालये आदर्शवत काम करीत असून आम्हाला या वाचनालयांचा अभिमान आहे. या वाचनालयांचे रखडलेले प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. बांदा सरपंच मंदार कल्याणकर यांनीही नट वाचनालय हे बांदा गावचे शिरोमणी आहे. या वाचनालयाच्या कार्याचा गौरव करावा तितका थोडाच आहे. या वाचनालयाचे काही प्रश्‍न आहेत ते आम्ही शिक्षणमंत्री आणि इतर संबंधित अधिकार्‍यांशी बोलून मार्गी लावू, असे आश्‍वासन दिले.

डॉ.रुपेश पाटकर यांनी वाचन संस्कृती म्हणजे काय यावर भाष्य करताना भूक लागली की खाणे म्हणजे प्रवृत्ती, भूक नसतानाही खाणे म्हणजे विकृती आणि स्वतःला भूक लागली असतानाही आपला घास दुसर्‍याला देणे म्हणजे संस्कृती असल्याचे सांगत विस्तृत विवेचन केले. 

मंगेश मसके यांनी ग्रंथालयांना भेडसावणार्‍या समस्या  मांडल्या. जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले यांनी ऑडिट करताना येणार्‍या त्रुटी सांगत त्याबद्दल अधिक माहिती दिली. प्रमोद कामत, रणजित देसाई, मंदार कल्याणकर, श्रेया गोखले, श्‍वेता कोरगावकर, डॉ.रुपेश पाटकर, शीतल राऊळ, सचिन नाटेकर, उषा आठल्ये यांच्यासह अधिवेशनाचे योग्य नियोजन करणार्‍या नट वाचनालयाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक व परिचय प्रकाश तेंडोलकर यांनी  तर सूत्रसंचालन चंद्रकांत सावंत यांनी केले. आभार प्रकाश तेंडोलकर यांनी मानले. वाचनालयाचे सहकार्यवाह मनोज मालवणकर, उपाध्यक्ष राजेंद्र केसरकर, संचालक एस. आर. सावंत, सुभाष मोरये, शंकर नार्वेकर, नीलेश मोरजकर, उर्मिला जोशी आदींसह जिल्ह्यातील ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.