Tue, Apr 23, 2019 19:35होमपेज › Konkan › मान्सून लवकरच...‘नवरंग’ने संकेत दिला

मान्सून लवकरच...‘नवरंग’ने संकेत दिला

Published On: May 27 2018 9:36AM | Last Updated: May 27 2018 9:36AMराजापूर : प्रतिनिधी

मान्सूनच्या आगमनाची चाहूल देणार्‍या नवरंग पक्ष्याचे कोकणामध्ये आगमन झाले. येत्या काही दिवसांमध्ये मान्सून आगमनाचे संकेत मिळत आहेत. नवरंग पक्ष्याने दिलेल्या संकेतामुळे हवामानातील वाढता उकाडा, तीव्र पाणीटंचाई या पार्श्‍वभूमीवर दिलासा मिळाला आहे. 

गेल्या काही वर्षामध्ये पावसाच्या आगमन-निर्गमनामध्ये सातत्याने होत असलेल्या बदलावामुळे पावसाचे वेळापत्रकच बदलले आहे. पावसाबाबतचे वेधशाळेचे अंदाजही अनेकवेळा चुकतात. मात्र, काही पक्षी, प्राणी मान्सूनच्या आगमनाची पूर्वसूचना अचूक देतात.

पावसाच्या आगमनाचे संकेत देणारी कोलकांद्याची फुलेही बहरली आहेत. श्रीलंका ते हिमालयाचा पायथा असे स्थलांतर प्रवास करणार्‍या नवरंगला मान्सूनच्या आगमनाचा अंदाज येताच भारतामध्ये विशेषतः कोकणामध्ये डेरेदाखल होतो.

मैनेएवढा भडक रंगाचा आणि भुंड्या शेपटीचा हा पक्षी रंगाने हिरवा आहे. निळा, तांबूस, काळा आणि पांढरा असा वरच्या अंगाचा रंग असून पोट आणि शेपटीचा खालचा भाग किरमिजी रंगाचा असून मनुष्यवस्तीच्या जवळ वा ओढे, नाले यांच्या सभोवतालच्या दाट झुडूपांमध्ये आढळतो. नवरंग पक्षी ओरडण्यापूर्वी ताठ बसून डोके मागे झुकवून मग जोरात ओरडतो. एका पक्ष्याने विशिष्ट आवाज काढल्यानंतर वा शिट्टि वाजवल्यानंतर त्या परिसरामध्ये वेगवेगळ्या दिशांना असलेले नवरंगचे जातभाई तशाचप्रकारचा आवाज काढून प्रतिसाद देतात. शिट्टि मधील ग्रुपिंग अनाकलनीय आहे.