Wed, Jul 17, 2019 18:41होमपेज › Konkan › सिद्धिविनायक ट्रस्टतर्फे सिंधुदुर्गात सुसज्ज ट्रामा केअर सेंटर

सिद्धिविनायक ट्रस्टतर्फे सिंधुदुर्गात सुसज्ज ट्रामा केअर सेंटर

Published On: Feb 23 2018 1:18AM | Last Updated: Feb 22 2018 10:38PMओरोस : प्रतिनिधी 

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गा नजीक एक सुसज्ज ट्रामा केअर सेंटर व सोळा डायलेसीस युनिट उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, जलयुक्त शिवार अभियानासाठी या सिद्धिविनायक गणपती मंदिर  न्यासाच्या वतीने एक कोटी रुपयाचा धनादेश बांदेकर यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत दिला. 

सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी गुरुवारी सर्व न्यास विश्‍वस्तांसह  जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची भेट घेतली. पालकमंत्री  दीपक केसरकर, आ. वैभव नाईक, सिद्धिविनायक ट्रस्टचे कोषाध्यक्ष सुमंत घैसास यांच्यासह विश्‍वस्त गोपाळ दळवी, संजय सावंत,विशाखा राऊत, अ‍ॅड. पंकज गोरे, सुबोध आचार्य, वैभवी चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवी जाधव उपस्थित होते.

आदेश बांदेकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गालगत सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून ट्रामा केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे केली आहे. न्यासाकडून जिल्ह्यात ट्रस्टच्या माध्यमातून 16 डायलेसीस  मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.यात जिल्हा रूग्णालयात 2,सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात 2, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात 4, मालवण ग्रामीण रुग्णालयात 4, देवगड ग्रामीण रुग्णालयात 4 या प्रकारात विभागणी करून डायलेसीस मशीन आणि आरओ प्लॅन्टस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

सिद्धिविनायक मंदिर येथे भाविकांच्या माध्यमातून देणगी व दानाच्या स्वरूपात जमा होणारा फंड गरीब रूग्णांच्या कल्याणासाठी खर्च करण्याचा न्यासाचा मानस आहे. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू आहे. अशा रूग्णांना प्रत्येकी 25 हजार रुपये च्या मर्यादेत राहून मदत केली जाते.गरजूंनी याचा उपयोग करून घ्या असे आवाहन आदेश बांदेकर यांनी केले.तसेच लोकोपयोगी कार्यक्रम ही मोठ्या प्रमाणावर केले जातात. पावणे दोन लाख पुस्तकांचे वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत,अवघ्या 275रुपयात डायलेसीसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.  लोकांचा निधी लोकांपर्यत पोचवण्यासाठी श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यास अग्रेसर असल्याचे बांदेकर यांनी सांगितले.  न्यासाकडून 34 जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांसाठी साडेसात कोटी निधी खर्च करून 102 डायलेसीस मशीन व आरओ प्लॅन्टस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपकरणाच्या खरेदीचा निधी हाफकीन कार्पोरेशन कंपनीला देण्याबाबत शासन मान्यता दिली आहे.