Fri, Jan 24, 2020 22:44होमपेज › Konkan › कोळंबी बीज संवर्धन केंद्रांना साडेतीन कोटी

कोळंबी बीज संवर्धन केंद्रांना साडेतीन कोटी

Published On: Jun 05 2019 1:29AM | Last Updated: Jun 05 2019 1:29AM
रत्नागिरी ः प्रतिनिधी

मत्स्य संपत्तीला पाठबळ देण्यासाठी नीलक्रांती योजनेअंतर्गत कोकणतील पाच जिल्ह्यात निमखार्‍या पाण्यातील सात कोळंबी बीज संवर्धन केंद्रांना 3 कोटी 55 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला 
आहे. यामध्ये कोकणातील पाचही जिल्ह्यांत एक मिनी, तर तीन जिल्ह्यांच्या दोन गटांसाठी दोन जम्बो कोळंबी गटांना प्रत्येकी एक कोळंंबी संवर्धन केंद्र मंजूर करण्यात आले आहे. नव्याने सुरू होणार्‍या मत्स्य हंगामापूर्वी या केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे.

कोकणातील किनारपट्टी भागात असलेल्या निमखार्‍या क्षेत्रात मत्स्य बीज निर्मितीला पोषक वातावरण आहे. त्यातही कोळंबीसारख्या प्रजातीच्या निर्मितीसाठी कोकणातील पाचही जिल्ह्यांत अनुकुलता आहे. यानुसार शासनाने  ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांच्या गटासाठी आणि रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दुसर्‍या गटासाठी प्रत्येकी  एक जम्बो कोळंबी संवर्धन केंद्र मंजूर केले आहे. यासाठी प्रत्येकी एक कोटी 15 लाखांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक मिनी कोळंबी संवर्धन केंद्र मंजूर केले आहे. यासाठी प्रत्येकी 25 लाखांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.  

नव्या मत्स्य हंगामात केंद्राची मुहूर्तमेढ 

रत्नागिरी जिल्ह्यात निमखार्‍या पाण्यातील मिनी संवर्धन केंद्र मिर्‍या येथे होणार असून जास्त बीज निर्मिती असलेल्या बीज निर्मिती केंद्रासाठी दापोली तालुक्यातील जागेची निवड करण्यात 
आली आहे. हे केंद्र रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. निलक्रांती योजनेंतर्गत या योजनेचा समावेश 2017 मध्ये करण्यात आला होता. यासाठी तीन कोटी 55 लाखाचा आराखडा तयार करण्यात आला होता.निधीला मान्यता देताना ऑगस्टमध्ये सुरू होणार्‍या नव्या मत्स्य हंगामात या केंद्राची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे.