Sun, Aug 18, 2019 20:42होमपेज › Konkan › चुकलेल्या बालकाला दाखवला बालकांनीच मार्ग

चुकलेल्या बालकाला दाखवला बालकांनीच मार्ग

Published On: Jun 29 2018 12:06AM | Last Updated: Jun 28 2018 10:55PMदापोली : वार्ताहर

आईचा हात सोडून वाट चुकलेल्या एका बालकाला दुसर्‍या बालकांनी प्रसंगावधान दाखवत त्याच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवले. यामुळे या मुलांचे परिसरातून कौतुक होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील नारगोली येथील मयूर जागडे हा 13 वर्षांचा मुलगा आपल्या आईबरोबर मंडणगड तालुक्यातील वेरळ येथील शाळेत दाखला आणण्यासाठी गेला होता. ते दोघेही दापोलीपर्यंत आले. त्यानंतर नारगोलीकडे जाणार्‍या गाडीत चढताना सायंकाळच्या गर्दीत आपल्या आईचा हात सुटला आणि तो मागे राहिला. मुलगा आपल्याबरोबरच गाडीत आला असे समजून आई गाडीत बसली. तोपर्यंत गाडी बसस्थानकातून मार्गस्थ झाली आणि मयूर मात्र गाडीबाहेरच राहिला.

हातात एकही रुपया नसणार्‍या  व गाडीबाहेर राहिलेल्या भांबावलेल्या मयूरला काय करावे हे समजेना. अखेर स्थानकाबाहेर येऊन त्याने गावाकडे जाणार्‍या गाड्यांना हात दाखवला. मात्र, त्याला एकही गाडी उभी राहिली नाही. 

शेवटी त्याला रडू आवरेना. त्याचवेळी लोकमान्य हायस्कूल, काळकाई कोंड-दापोली येथे शिकणारे व बहुजन हिताय वसतिगृहात राहणारे केतन पवार, आदित्य आटकोरे व त्याचा भाऊ (इ. 8 वी) या तीन विद्यार्थ्यांना तो रडताना दिसला. त्यांनी त्याची विचारपूस करीत त्याला दापोली पोलिस ठाण्यात नेले. त्यावेळी ठाणे अंमलदार सहायक पोलिस उपनिरीक्षक झगडे यांनी मयूरची माहिती घेतली. मयूरकडे त्याच्या नातेवाईंकाचा संपर्क नंबर  मिळाला नाही.

यावेळी तो नारगोलीचा असल्याचे व टाळसुरे येथील इंग्लिश स्कूल येथे शिकत असल्याचे समोर आले. त्यानंतर मुख्याध्यापक संदेश राऊत यांच्याकडे संपर्क साधून त्याला त्यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानंतर मुख्याध्यापकांनी मयूरची माहिती पालकांपर्यंत कळवली आणि अखेर रस्ता चुकलेला मयूर आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचला.