Thu, Apr 25, 2019 15:23होमपेज › Konkan › नेटवर्कच्या अडचणीचा रेशन दुकानदारांना फटका

नेटवर्कच्या अडचणीचा रेशन दुकानदारांना फटका

Published On: Jun 01 2018 2:06AM | Last Updated: May 31 2018 10:01PMराजापूर : प्रतिनिधी

राजापूर तालुक्यात बहुसंख्य रास्त धान्य दुकानांमध्ये पॉस मशिनला आवश्यक नेटवर्क मिळत नसल्याने अशा दुकानदारांना पूर्वीप्रमाणे धान्य विक्री करावी लागत आहे. मात्र, ऑफलाईन धान्य वाटप केल्यास कमिशनमध्ये कपात करण्यात येत असल्याने रेशन दुकानदार अडचणीत सापडले आहेत. पॉस मशिनला नेटवर्क मिळत नाही, यात दुकानदारांचा काय दोष? असा सवाल रेशन दुकानदारांकडून उपस्थित करण्यात येत आहे. दुकानदारांना पूर्वीप्रमाणे 100 टक्के कमिशन मिळत नाही, तोपर्यंत धान्य उचल न करण्याचा निर्णय रास्त धान्य दुकान चालक मालक संघटनेने घेतला आहे. तसे निवेदन संघटनेमार्फत राजापूर तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

शासनाने दि.1 मे 2018 पासून नवी धान्य वितरण प्रणाली लागू केली आहे. यामध्ये रास्त धान्य दुकानदारांना पॉस मशिनद्वारे धान्य विक्री करण्याची सक्‍ती केलेली आहे. मात्र, या नव्या प्रणालीमध्ये काम करत असताना दुकानदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवाय ग्राहकांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे. राजापूर तालुक्यातील सुमारे 80 ते 85 टक्के दुकानांमध्ये पॉस मशिनला नेटवर्कचा मोठा अडथळा येत आहे. मशिन चालू केल्यावर नेटवर्क मिळण्यास सुमारे 30 ते 35 मिनिटे लागतात आणि 5 ते 10 मिनिटे चालल्यावर पुन्हा नेटवर्क जाते. पुन्हा एक-दोन तास नेटवर्कची वाट पहावी लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ज्या ठिकाणी नेटवर्क आहे. त्याठिकाणीही अनेकदा डाटा परिपूर्ण डाऊनलोड होत नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. तर अपुर्‍या नेटवर्कमुळे मशिनची बॅटरी लवकर संपत असून मशिन बंद पडत आहेत. या सर्व पद्धतीमध्ये दुकानदारांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव दुकानदारांना ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटप करावे लागत आहे.

दुकानदारांना शासनाच्या आनलाईन धान्य वितरण प्रणालीमध्ये काम करण्याची इच्छा असतानाही अशा अडचणींमुळे धान्य वितरण करणे शक्य होत नाही. त्यातच दुकानदारांनी ऑफलाईन धान्य विक्री केल्यास त्यांना मिळणार्‍या कमिशनमध्ये 70 रूपये कपात केली जात आहे. दुकानदारांचा कोणताही दोष नसताना कमिशनमध्ये कपात केली जात असल्याने दुकानदारांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे दुकानदारांतून तीव्र नाराजी व्यक्‍त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर राजापूर तालुका रेशन दुकानदार संघटनेची गुरूवारी बैठक पार पडली. या बैठकीत जोपर्यंत दुकानदारांना 100 टक्के कमिशन मिळत नाही तोपर्यंत धान्य उचल न करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.