होमपेज › Konkan › शिवसेनेच्या आदेश शिस्तीचा भंग?

शिवसेनेच्या आदेश शिस्तीचा भंग?

Published On: Jun 17 2018 10:27PM | Last Updated: Jun 17 2018 10:22PMरत्नागिरी : भालचंद्र नाचणकर

जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष थेराडे यांनी संघटनात्मक आदेशानुसार पदाचा राजीनामा दिला नाही. जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी हा आदेश दिला होता. त्यामुळे शिवसेनेच्या आदेश आणि शिस्तीची सहा वर्षांपूर्वीच्या टर्मची आठवण काढली जात आहे. त्यावेळी उपाध्यक्षपदासाठी विद्यमान जि. प. सदस्य आणि गटनेते उदय बने यांची उपाध्यक्षपदी निवड झाली होती. त्याच दिवशी त्यांना पदाचा राजीनामा देण्याचा आदेश मिळाला. त्यानुसार त्यांनी तातडीने राजीनामा दिला आणि उपाध्यक्षपदी विलास अवसरे यांची निवड झाली होती.

शिवसेनेमध्ये आदेश मान्य करणे, हा एक शिस्तीचा भाग आहे. जि. प.मध्ये शिवसेनेचे पूर्ण वर्चस्व आहे. सव्वा वर्ष पूर्ण होत आल्यानंतर उपाध्यक्षांसह सभापतींनी 14 जून रोजी राजीनामा देण्याचे आदेश जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी दिले. त्यानुसार सभापती दीपक नागले, चारुता कामतेकर, ऋतूजा खांडेकर यांनी त्याच दिवशी म्हणजे गुरुवारी आपल्या सभापती पदांचे राजीनामे दिले. या दिवशी सभापती अरुण ऊर्फ अण्णा कदम हे जिल्ह्याबाहेर असल्याने ते त्या दिवशी राजीनामा देऊ शकले नाहीत. दुसर्‍या दिवशी शुक्रवारी त्यांनी जि. प. अध्यक्षा स्नेहा सावंत यांच्याकडे राजीनामा दिला.

उपाध्यक्ष संतोष थेराडे यांनी राजीनामा न दिल्याने शिवसेनेच्या आदेशरूपी शिस्तीची आठवण काढली जाऊ लागली. सन 2007 ते 2012 च्या टर्ममध्ये त्यावेळीही जि. प. सदस्य असलेल्या आणि आत्ताचे शिवसेनेचे गटनेते असलेल्या उदय बने यांना उपाध्यक्षपद देण्यात आले. परंतु, त्यावेळी अचानक उदय बने यांना संघटनेने पदाचा राजीनामा देण्याचा आदेश दिला. कोणताही मागचा-पुढचा विचार न करता त्यांनी तातडीने उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर उपाध्यक्षपदी विलास अवसरे यांची निवड झाली होती.

एकीकडे शिवसेनेत अशी शिस्त पाळली जात असताना यावेळी आदेश धुडकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे असे का घडले? याबाबत शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने खुलासा केलेला नाही. त्यामुळे सध्या तरी आदेशाचे धिंडवडे निघण्यास प्रारंभ झाला आहे की काय? अशा चर्चा जोर धरू लागल्या आहेत. दरम्यान, संघटनेचा आदेश न पाळण्यामागे आधी अध्यक्षांनी राजीनामा द्यायचा की उपाध्यक्षांनी? याबाबत निश्‍चितता नसल्याने आदेश मानण्यासंदर्भात गोंधळ उडाला असल्याचे समजते.

उपाध्यक्ष संतोष थेराडे हे खा. विनायक राऊत यांच्या खास मर्जीतील नेते म्हणून ओळखले जातात. यासंदर्भात त्यांनी खासदारांशी चर्चा करूनच राजीनामा दिला नसल्याचे समजते. शिवसेना-भाजपची युती असताना जि. प.चे उपाध्यक्ष किंवा महिला बालकल्याण सभापतीपद भाजपकडे असायचे. उपाध्यक्षपद भाजपकडे असायचे. परंतु, त्यांच्याकडे सव्वा वर्षाची निश्‍चिती वगैरे काही नव्हते. त्यामुळे शिवसेनेच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदाचा कार्यभार भाजपच्या उपाध्यक्षांकडे जात होता. याच पद्धतीने कार्यवाही व्हावी अशी उपाध्यक्षांकडून अपेक्षा असल्याचे मानले जात आहे.
जिल्हा परिषदेमध्ये आता सेना-भाजप युती नसून, एकहाती सत्ता शिवसेनेचीच आहे. सर्व पदाधिकारी शिवसेनेचेच असल्याने अध्यक्षांनी पहिला राजीनामा दिल्यानंतर प्रभारी अध्यक्षपद शिवसेनेकडेच राहणार आहे. त्यामुळे पूर्वीचीच पद्धत अवलंबल्यास कोणतीही भीती नाही. हीच भूमिका उपाध्यक्षांनी घेतली असावी आणि त्यांना खा. विनायक राऊत यांनीही पाठिंबा दिला असावा, असा तर्क मांडला जात आहे. त्यामुळे लवकरच अध्यक्षपदाचा राजीनामा झाल्यानंतरच उपाध्यक्षांचा राजीनामा होणार हे स्पष्ट होत आहे.