Thu, Apr 25, 2019 16:22होमपेज › Konkan › पदवीधर निवडणुकीच्या तयारीसाठी सेनेची खलबते

पदवीधर निवडणुकीच्या तयारीसाठी सेनेची खलबते

Published On: Jun 05 2018 1:16AM | Last Updated: Jun 04 2018 9:03PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीप्रमाणे अनुभव येऊ नये म्हणून शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी काळजीपूर्वक पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून खासदार, आमदार, युवा नेते आणि प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. यावेळी विजयासाठी कोणती रणनिती आखायची याबाबत खलबते करण्यात आली.

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला यश मिळू शकले नाही. भाजपने या निवडणुकीत बाजी मारल्यानंतर शिवसेनेने आता कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

सोमवारी संध्याकाळी खा.विनायक राऊत, आ.उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीत बैठक झाली. या बैठकीला प्रमुख युवा नेत्यांसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी तरी भाजपला संधी द्यायची नाही, असा विचार करून प्रचारादरम्यान काय करायचे? याची रणनिती आखण्यात आली. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची सर्व सूत्रे शिवसेनेचे नेते तथा केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याकडे होती. या निवडणुकीच्या शिवसेनेच्या तयारीत ना. गीते सुरक्षित अंतरावर आहेत.