Wed, Jul 24, 2019 12:10होमपेज › Konkan › ‘नाणार’ विरोधात ‘धो-धो’तही आक्रोश

‘नाणार’ विरोधात ‘धो-धो’तही आक्रोश

Published On: Jul 09 2018 1:03AM | Last Updated: Jul 09 2018 1:03AMराजापूर : प्रतिनिधी

स्थानिकांचा शंभर टक्के विरोध असतानाही केंद्र व राज्य शासनाने रिफायनरी प्रकल्प लादण्याचे जे प्रयत्न चालविले आहेत त्याच्या निषेधार्थ शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील डोंगर तिठा ते चौके या दरम्यान  रविवारी काढण्यात आलेल्या ‘चले जाव संघर्ष यात्रे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुसळधार पाऊस कोसळत असतानाही त्याची पर्वा न करता हा मोर्चा काढण्यात आला.

मोर्चादरम्यान विद्यमान केंद्र व राज्य शासनाविरोधात घोषणांनी प्रकल्प परिसर दणाणून गेला. मोर्चा संपल्यावर खा. विनायक राऊत यांच्यासह सेनेच्या नेत्यांनी केंद्र व राज्य शासनाविरोधात टीकेची झोड उठवताना शिवसेना हा प्रकल्प रद्द केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे ठणकावले.

नाणार परिसरातील 14 गावांतील जनतेचा 100 टक्के विरोध असताना विद्यमान केंद्र व राज्य सरकारने नाणार परिसरावर रिफायनरी प्रकल्प लादल्याचा आक्षेप घेत शिवसेनेने त्या विरोधात मागील काही महिन्यांत जोरदार विरोध केला आहे. शासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली रिफायनरी प्रकल्पासह सौदी अरेबियाची अराम्को व आबुधाबीच्या डनॉक कंपनीला ‘चले जाव’ करण्यासाठी संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. 

या निमित्त रविवार जुलैला सकाळीडोंगर तिठा ते चौके अशा सुमारे 4  कि.मी.ची पदयात्रा काढण्यात आली. या यात्रेत खा. विनायक राऊत यांच्यासह आ. राजन साळवी, जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडीक, सेनेचे उपनेते, आ. उदय सामंत, संघर्ष समितीचे सचिव भाई सामंत यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संखेने सहभागी झाले होते. संघर्ष यात्रेत सेनेचे मुंबईचे पदाधिकारीही सहभागी झाले होते. स्थानिक प्रकल्पग्रस्तांचाही मोठा सहभाग होता .

सकाळी अकराच्या सुमारास  संघर्ष यात्रेला सुरुवात झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींसह भाजपाविरुध्द घोषणाबाजी करण्यात आली. या भागात सकाळपासून पावसाचा जोर कायम असतानाही  त्याची पर्वा न करता संघर्ष यात्रा  पार पडली.

डोंगर तिठा ते चौके असा प्रवास झाल्यावर चौके येथे त्या यात्रेचे सभेत रुपांतर झाले. त्यावेळी केंद्र व राज्य शासनानावर टीका करण्यात आली. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच टिकेचे मुख्य लक्ष होते. एकीकडे मुख्यमंत्री हा प्रकल्प लादणार नाही, जनतेशी चर्चा करु, असे सांगतात पण ते नाणारला येऊन येथील जनतेला का भेटत नाहीत, असा खडा सवाल खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित करीत निसर्गरम्य कोकणला अरबांच्या घशात घालण्याचा डाव या भाजप वाल्यांनी रचलल्याचा आरोप केले. शिवसेना त्यांचा हा प्रयत्न कदापीही खपवून घेणार नाही, असे त्यांनी सुनावले. आम्हाला राजपुत्र नको तर भूमिपुत्र हवे आहेत, अशा शब्दात  खा. राऊत यांनी शासनाला  फटकारले.

सिडकोच्या जमीन विक्री व्यवहार प्रकरणी शासनाने जसे चौकशीचे आदेश दिले तशाच प्रकारे नाणारमधील परप्रांतियांकडून झालेल्या सर्व जमिनींच्या खरेदीच्या व्यवहारांचीही चौकशी हे राज्य शासन का करीत नाही, असा सवाल शिवसेना उपनेते व रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी उपस्थीत केला व आपल्या मतदारसंघातील जनता तुमच्यासमवेत राहिल, असे अभिवचन दिले. 

कोकणात बळजबरीने लादलेला हा प्रकल्प केवळ शिवसेनाच रद्द करु शकते, हे आता येथील जनतेला कळून चुकले असून जोवर हा प्रकल्प शासन रद्द करणार नाही, तोवर आमचा लढा असाच सुरु राहिल, असा इशारा आ.  राजन साळवी यांनी दिला स्थानिक संघर्ष समितीच्या वतीने त्यांचे नेते भाई सामंत व सिंधुदुर्गातून खास उपस्थित असणारे केळकर यांनही रिफायनरीवरुन शासनाचा समाचार घेतला. प्रकल्पाविरोधात पुढील टप्प्यात प्रकल्पग्रस्त गावांमधून रत्नागिरीपर्यंत  संघर्ष यात्रा काढली जाणार असल्याची माहिती शिवसेनेच्या वतीने देण्यात आली.