Thu, Apr 25, 2019 14:07होमपेज › Konkan › शिवसेनेची दळवींवरची माया ओसरली?

शिवसेनेची दळवींवरची माया ओसरली?

Published On: Mar 26 2018 1:30AM | Last Updated: Mar 25 2018 10:33PMदापोली : प्रवीण शिंदे

‘दापोली मतदार संघ म्हणजे सूर्यकांत दळवी’ असे मागील 25 वर्षे समीकरण होते. ते नाव आता शिवसेना नेत्यांकडूनच पुसले गेले आहे. पर्यावरण राज्यमंत्री रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांच्या नावाची वर्णी आगामी दापोली विधानसभा मतदार संघ निवडणुकीसाठी लागली आहे. या सर्व घडामोडीत एकेकाळी ज्यांनी शिवसेना वाढवली त्या शिवसेनेचे आणि सध्याच्या नेत्यांची दळवींवरील माया कशी काय कमी झाली? याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे.

माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि ना. रामदास कदम यांचा वाद गेल्या काही वर्षांपासून दापोलीच्या राजकारणात धुमसत होता. हा वाद गेल्या काही वर्षांत टोकाला गेला. यातील प्रकरणे अगदी ‘मातोश्री’पर्यंत जाऊन पोहोचली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवेळी कार्यकर्त्यांसाठी ना. कदम आणि दळवी यांनी आपापली प्रतिष्ठा पणाला लावली. त्यातून दळवी गटाचे राजीनामा सत्र घडले. मात्र, ‘मातोश्री’ने याबाबत ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’चा निर्णय घेतला. नवीन कार्यकारिणी देखील जाहीर झाल्या. पण दळवी यांना योग्य न्याय मातोश्रीकडून मिळाला नाही.

दापोलीत पंचायत समिती, जिल्हा परिषद, दापोली नगर पंचायत निवडणुकीत दळवी यांना मानाचे स्थान पक्षाकडून मिळाले नाही. या निवडणुुकीत सामील व्हा, असे दळवी यांना पक्षाने सांगितले नाही. दापोलीचे नेतृत्व माझ्याकडे द्या, अशी मागणी दळवी यांनीही केली होती. ऐन निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना न्याय देता आला नाही, याची सल दळवी यांच्या मनात कायम राहिली. या सर्व घडामोडीत योगेश कदम यांच्याकडे दापोलीतील निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर शिवसेनेने चांगले यशही मिळवले. आजतागायत दळवी-कदमांचे  शह काटशहाचे राजकारण सुरूच आहे. आपल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही, या तत्त्वाने ईर्ष्येला पेटलेल्या दळवी यांनी मध्यंतरीच्या काळात पक्षातील नाराजांची मोट बांधायला सुरूवात केली. मात्र, यामुळे दापोलीतील शिवसेनेच्या राजकारणात फारसा फरक पडला नाही. 

गेल्या काही महिन्यांत दापोली तालुक्यात शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या अनेक सभा झाल्या. या सभेतून विरोधकांवर टीका कमी तर शिवसेनेच्याच दळवी यांचा समाचार जास्त घेतल्याचे चित्र दिसून आले. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून दळवी यांच्यावर सातत्याने टीका होत राहिली.

आगामी काळात होणार्‍या विधानसभा निवडणुकीत येथील मतदारसंघाची उमेदवारी आपल्याला मिळेल, असा अंदाज दळवींना होता.  परंतु तोही आता सेनेच्या नेत्यांनी फोल ठरविला आहे. दळवी यांच्याकडे सेनेचे वरिष्ठ नेतृत्व दुर्लक्ष करीत असल्याचे कित्येक वेळा स्पष्ट झाले आहे. नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात ना. सुभाष देसाई, ना. रवींद्र वायकर, ना. अनंत गीते यांनी ना. रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांना आमदारकीचा टिळा लावला आहे. त्यामुळे दळवी यांच्या ताब्यातील दापोलीचा गड योगेश कदम आणि रामदास कदम यांच्या ताब्यात जाणार हे आता जवळपास निश्‍चित झाल्याचे बोलले जात आहे. यावेळी ना. रामदास कदम यांनीही दळवी यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. यात इतर सेना नेत्यांनीही सूर मिळविला होता. एकंदरीत दापोलीतील शिवसेनेत अंतर्गत विरोधाचे राजकारण गेल्या काही वर्षांपासून टोकाला पोहोचल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात याचे काय पडसाद उमटतात? याचा फायदा शिवसेनेला होणार की विरोधकांना?  याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Tags : Shivsena, ignored, former MLA Suryakant Dalvi,