Wed, Apr 24, 2019 07:32होमपेज › Konkan › शिवसेनेच्या पाच पं.स. सभापतींचे राजीनामे

शिवसेनेच्या पाच पं.स. सभापतींचे राजीनामे

Published On: Jun 08 2018 1:22AM | Last Updated: Jun 07 2018 10:38PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी            

जिल्हाप्रमुखांच्या सूचनेनुसार रत्नागिरीसह राजापूर, लांजा, संगमेश्‍वर आणि खेड पंचायत समितीच्या सभापतींनी आपल्या पदांचे राजीनामे जिल्हा परिषद अध्यक्षांकडे दिले. गुरूवारी हे राजीनामे आल्यानंतर ते जि.प. अध्यक्षा स्नेहा सावंत यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे सादर केले आहेत. शुक्रवारी ते राजीनामे पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे दिले जाणार आहेत.

शिवसेनेच्या पंचायत समिती सभापतींना सव्वा वर्षांचा कालावधी निश्‍चित करण्यात आला होता. या नियोजनानुसार सव्वा वर्ष संपत आल्याने जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्‍वरच्या सभापतींना राजीनामे सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. खेड पंचायत समिती सभापतींनाही त्यांच्या जिल्हाप्रमुखांनी राजीनामा देण्यास सूचित केले होते.

त्यानुसार शिवसेनेच्या या पाच  सभापतींनी राजीनामे सादर केले आहेत. रत्नागिरी पं.स. सभापती मेघना पाष्टे, राजापूर सभापती सुभाष गुरव, लांजा सभापती दिपाली दळवी, संगमेश्‍वर सभापती सारिका जाधव आणि खेडच्या सभापती भाग्यश्री बेलोसे यांनी आपल्या पदांचे राजीनामे जि.प.अध्यक्षांकडे दिले आहेत. हे राजीनामे जि.प. प्रशासनाकडे गेले असून ते उद्या शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केले जाणार आहेत.