Sun, Feb 23, 2020 03:07होमपेज › Konkan › शिवसेनेचे वर्चस्व

शिवसेनेचे वर्चस्व

Published On: Dec 28 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 10:39PM

बुकमार्क करा
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी

जिल्ह्यातील देवगड, कुडाळ, वेंगुर्ले व कणकवली तालुक्यांतील दुसर्‍या टप्प्यातील काही ग्रा. पं. च्या सार्वत्रिक निवडणुका मंगळवारी झाल्या. बुधवारी या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यात वेंगुर्ले, कुडाळ व देवगड तालुक्यांत शिवसेनेने बाजी मारल्याचे दिसून आले. तर भाजप व स्वाभिमान पक्ष यांना संमिश्र यश मिळाले. काही ग्रा. पं. वर गाव पॅनेलने विजय मिळविला आहे.

देवगड व  कुडाळ  तालुक्यांतील काही गावे दिग्गज लोकप्रतिनिधींची असल्याने या निवडणुका लक्षवेधी ठरल्या होत्या. अनेक ठिकाणी युतीतील मित्रपक्ष शिवसेना व भाजप या निवडणुकांसाठी एकमेकांसमोर उभे ठाकले होते. तर काही ठिकाणी स्वाभिमान पक्षाने भाजपला छुपे समर्थन दिले होते. 

देवगडमध्ये सेनेची अनपेक्षित घोडदौड 

देवगडातील सात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने सर्वाधिक चार, तर भाजप, समर्थ विकास पॅनेल व गाव विकास पॅनेलने प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले. दिग्गजांसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या  या निवडणुकीमध्ये राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी वळीवंडे ग्रामपंचायत, माजी आमदार प्रमोद जठार यांनी शिरवली ग्रामपंचायत स्वत:कडे राखली, तर सभापती जयश्री आडिवरेकर यांचे होम पिच असलेल्या फणसगाव ग्रामपंचायतीमध्ये भाजप पुरस्कृत पॅनलला पराभवाचा झटका बसला.

माजी उपसभापती नासीर मुकादम हे रामेश्‍वर सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले. वळीवंडे, वानिवडे, पावणाई व विठ्ठलादेवी या चार ग्रामपंचायतींवर  शिवसेनेने दावा केला आहे. रामेश्‍वरमध्ये स्वाभिमान, फणसगावमध्ये गाव पॅनेल, तर शिरवलीमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले.