Sun, Dec 15, 2019 02:45होमपेज › Konkan › ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व

Published On: Feb 26 2019 1:17AM | Last Updated: Feb 26 2019 1:17AM
रत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यात झालेल्या 24 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व दिसून आले. भाजप व काँग्रेसच्या हाती काही लागले नसले तरी राष्ट्रवादीने सेनेला टक्‍कर दिली. काही गावांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवत गाव पॅनेलला पसंती दिली. गुहागरमध्ये बहुचर्चित पालशेत ग्रामपंचायतीत शिवसेना व राष्ट्रवादीची आघाडी लक्षवेधी ठरली होती. या आघाडीने भाजपवर मात दिली.जिल्ह्यात 40 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. 

यातील 16 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर 24 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. खेड-दापोली व मंडणगड विधानसभा मतदारसंघात शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये ‘काँटे की टक्‍कर’ दिसून आली. युवा नेते योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली दापोली, मंडणगडमध्ये राष्ट्रवादीला सेनेने धोबीपछाड दिली आहे.

मंडणगडमध्ये 12 पैकी चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित आठ ग्रामपंचायतींमध्ये 6 शिवसेना तर दोन ठिकाणी राष्ट्रवादीने बाजी मारली. दापोली तालुक्यात सहापैकी दोन ग्रामपंचायतींवर भगवा फडकला तर एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने बाजी मारली. एक ग्रामपंचायत गावपॅनेलच्या ताब्यात गेली. 

चिपळूण तालुक्यात आठपैकी चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर चार ग्रामपंचायतींवर गावपॅनेलने बाजी मारली. राजापुरात झालेल्या दोन्ही ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला. आमदार राजन साळवी व सभापती अभिजीत तेली यांनी याकडे विशेष लक्ष केंद्रीत केले होते. लांजा तालुक्यातील मठ ग्रामपंचायतीवर भगवा फडकवण्यात यश आले आहे. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी झालेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीत सेनेचे वर्चस्व दिसून आले.