Wed, Mar 20, 2019 12:47होमपेज › Konkan › शिवसेनेचे संपर्क अभियान सुरू

शिवसेनेचे संपर्क अभियान सुरू

Published On: Jul 09 2018 1:03AM | Last Updated: Jul 09 2018 1:03AMरत्नागिरी ः विशेष प्रतिनिधी

तालुक्यात आधीच विरोधकांची ताकद घटलेली असतानाच खा. विनायक राऊत आणि आ. उदय सामंत यांनी वर्षभरापूर्वीच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शहरात प्रभागनिहाय आणि ग्रामीण भागात गटनिहाय संपर्क दौरा सुरू केला आहे. त्यामुळे विरोधकांच्या गोटात धडकी भरण्याची लक्षणे आहेत. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या आहेत. यापूर्वी रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेचे 10 पैकी 10 सदस्य, पंचायत समितीचे 20 पैकी 18 सदस्य आणि नगर परिषदेचे 30 पैकी 17 सदस्य आणि नगराध्यक्ष शिवसेनेचे आहेत. तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींपैकी 80 ग्रामपंचायती शिवसेनेच्या वर्चस्वाखाली आहेत तर खाडी पट्ट्यातील 80 टक्के ग्रामपंचायती शिवसेनेकडेच आहेत. अशा भक्कम परिस्थितीतही शिवसेनेचे नेते खा. राऊत आणि आ. सामंत यांनी वर्षभरापूर्वीच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. 

प्रथम होणार्‍या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे संभाव्य उमेदवार विनायक राऊत यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्य मिळवून द्यायचे हेच सातत्य विधानसभा निवडणुकीतही ठेवायचे या दृष्टीने संपर्क दौरा अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे. ही सुरूवात कोतवडे जि. प. गटातून आणि रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक 1 व 2 मध्ये मेळावे घेऊन करण्यात आली आहे. या मेळाव्यांमध्ये शिवसेनेने आतापर्यंत केलेल्या विकासकामांची माहिती आणि प्रगतीपथावर असलेल्या कामांची माहिती दिली जात आहे. 

एकीकडे विकासकामांची माहिती दिली जात असतानाच अशा मेळाव्यांमधून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही शिवसेनेत घेऊन त्यांची शक्ती आणखी हीन केली जात आहे. इतकेच नव्हे तर ही दोन्ही नेतेमंडळी शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या कामांचे कौतूक करून सर्वांना प्रोत्साहित करत आहेत. निवडणुकी पूर्वीची शिवसेनेची ही तयारी विरोधकांच्या गोटात धडकी भरवणारी ठरत आहे.