Tue, Apr 23, 2019 21:36होमपेज › Konkan › शिवसेनेने गोव्याची खडी वाहतूक रोखली

शिवसेनेने गोव्याची खडी वाहतूक रोखली

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

दोडामार्ग : वार्ताहर

गोव्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये सिंधुदुर्गातील रुग्णांवरील उपचाराचे आकारले जात असलेले शुल्क रद्द करावे, या मागणीसाठी दोडामार्ग येथे जनआक्रोश आंदोलन सुरू असताना शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सिंधुदुर्गातून गोव्याकडे जाणारी खडी वाहतुकीचे ट्रक अडविण्यात आले. ‘गोवा-महाराष्ट्र सरकारला आम्ही अनेक दिवस सहकार्य केले; पण आरोग्याच्या विविध मागण्यांसाठी बसलेल्या आंदोलकांना न्याय मिळाला नाही. यासाठी गोव्यात जाणारे खडी वाहतुकीचे ट्रक आम्ही अडवून ठेवले आहेत. 72 तासांत जर गोवा राज्यात संबंधित रुग्ण शुल्क आकारणीवर निर्णय झाला नाही, तर तिलारी धरणाचे कालव्याद्वारे जाणारे पाणी बंद करू, असा इशारा शिवसेनेच्या दोडामार्ग तालुकाप्रमुख व पं. स. सदस्य बाबुराव धुरी यांनी दिला आहे. 

सोमवारी दोडामार्ग शहरातील गांधी चौकात गोव्यात जाणारे खडी वाहतूक करणारे ट्रक तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली रोखले. अचानक रास्ता रोको झाल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. या रास्ता रोकोत फक्‍त शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी खडीचे ट्रक अडविले, अन्य वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू ठेवली होती. 

याबाबत बाबुराव धुरी म्हणाले, गोवा राज्यात दोडामार्ग तालुक्यातून हजारो टन खडी जात आहे आणि गोव्यातील विविध प्रकल्प पूर्ण होत असून गोव्याचा विकास होत आहे. त्याच्या उलट आपला तालुका   भकास होत असून गोव्यातील बांबोळी रुग्णालयात सिंधुदुर्गातील रुग्णांना रुग्ण शुल्क फी आकारली जात आहे. या विरोधात सात दिवस तालुकावासीय आंदोलन करत आहेत. दोन्ही सरकार अद्यापपर्यंत काहीही निर्णय घेत नाहीत. दोन्ही राज्यांचे मंत्री महोदय मुद्दाम तालुकावासीयांना वेठीस धरण्याचे काम करत आहेत. म्हणून आम्ही तालुका शिवसेनेच्या वतीने पहिल्या टप्प्यात गोव्यात जाणारे खडी ट्रक रोखून धरले आहेत. शिवसेनेचे महाराष्ट्र राज्यात सरकारमध्ये आहे; पण याची आम्हाला फिकीर नाही. सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांसाठी आम्ही केव्हा, कधीही रस्त्यावर उतरणार असल्याचे श्री. धुरी यांनी सांगितले. 

यावेळी घटनास्थळी आलेल्या पोलिस निरीक्षक सुनील घासे, तालुकाप्रमुख श्री. धुरी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. सोमवारी जे रास्ता रोको आंदोलन झाले त्या आंदोलनाशी आमचा काहीही संबंध नाही, असे लेखी पत्र आरोग्याचा जनआक्रोश संयोजक कमिटीने दोडामार्ग पोलिसांना दिले आहे. आमचे आंदोलन शांततेत सुरू असून आम्ही आमच्या न्याय्य मागण्यांसाठी शांततेतच आंदोलन सुरू करणार असल्याचे संयोजकांच्या वतीने वैभव इनामदार यांनी सांगितले. सोमवारी शिवसेनेच्या रास्ता रोकोच्या आंदोलनानंतर उपविभागीय अधिकारी दयानंद गवस यांनी ओरोस येथून दंगल पथक बोलविण्यात आले होते. 

 

Tags : Dodamarg, Dodamarg news, Shivsena, Goa, traffic,


  •